Satara Protest: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जिल्ह्यातून पाठिंबा; हुतात्मा स्मारकासमोर कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन
Satara Protest: देशातील शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधात साताऱ्यातील सुभाषचंद्र बोस चौकात सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन.

Satara Protest – देशातील विविध स्पर्धा व शैक्षणिक परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधात आणि परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता व विश्वासार्हता प्रस्थापित करण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी सुभाषचंद्र बोस चौकातील हुतात्मा स्मारकासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. दिल्लीतील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आंदोलकांनी केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेबाबत तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
देशभरातील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होत असून, परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याची चिंता आंदोलकांनी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील उपोषणादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दलही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शांततामय आंदोलनाचा अधिकार अबाधित राहावा आणि लोकशाही पद्धतीने मांडल्या जाणार्या मागण्यांचा आदर केला जावा, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. आंदोलनानंतर प्रशासनामार्फत केंद्र सरकारला पाठविण्यात आलेल्या निवेदनामध्ये शिक्षण क्षेत्रातील परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी प्रभावी कायदेशीर व प्रशासकीय उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात शिवाजी जाधव, महारुद्र तिकुंडे, मोहन शिंदे, सुशांत मोरे, हणमंत शिंदे, कैलास कुंभार, महेंद्र बाचल, भारत जगताप, अॅड. मंगेश महामुलकर, एकनाथ सकपाळ, गुलाब बनसोडे, सादिकअली बागवान, गणेश अहिवळे, प्रशांत जाधव, प्रज्वल तिकुंडे, भारत रावळ, संदीप जाधव, विनोद कदम, दत्तात्रय जाधव, धनंजय कदम आणि सागर भोगावकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.





