Satara Protest : भटक्या विमुक्तांच्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन; माजी आमदार लक्ष्मण माने आक्रमक
Satara Protest : लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली विविध तालुक्यांतील कार्यकर्त्यांचा एल्गार; मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा.

Satara Protest – भटक्या विमुक्त जमातींच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्यावतीने शुक्रवारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पद्मश्री तथा माजी आमदार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनात सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून कार्यकर्ते, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
‘चलो सातारा’ या घोषवाक्यासह सकाळपासूनच आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची गर्दी होऊ लागली होती. यावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. भटक्या विमुक्त समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामध्ये प्रामुख्याने हैद्राबाद गॅझेटियर लागू करणे, मूळ 42 भटक्या विमुक्त जमातींना स्वतंत्र आरक्षण देणे, अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे,
ओबीसी आरक्षणातून वगळणे, केंद्र शासनाच्या अनुसूचित जाती-जमातींप्रमाणे सवलती लागू करणे, भटक्या विमुक्तांची जातनिहाय जनगणना करणे, 1961 चे पुरावे नसलेल्या नागरिकांना गृह चौकशीद्वारे जात प्रमाणपत्र देणे, निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच विकासासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करणे या मागण्यांवर भर देण्यात आला. संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून भटक्या विमुक्त समाज विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत असून शिक्षण,
रोजगार, निवास, आरक्षण आणि जात प्रमाणपत्राच्या प्रश्नांमुळे समाजाला प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने तातडीने ठोस निर्णय घेऊन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तालुकाध्यक्ष सागर पवार (सातारा), भगवान जाधव (कोरेगाव), रमेश जाधव (खटाव), दिलीप माने (माण), शंकर चव्हाण (कराड), विशाल साळुंखे (पाटण), अंकुश माने (खंडाळा), अनिल लाखे (वाई), संजय जावळे (जावली) आणि अमोल माने (फलटण) यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदविला. आंदोलनाच्या शेवटी शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत सादर करण्यात आले.





