Satara News : 65 वर्षांनंतरही पुनर्वसन रखडले! कोयना प्रकल्पग्रस्तांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत ठिय्या आंदोलन
Satara News : डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात बेमुदत आंदोलन सुरू; ९८७६ पैकी हजारो प्रकल्पग्रस्त अद्यापही न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत.

Satara News – कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या विस्थापनाला तब्बल 60 ते 65 वर्षे उलटूनही हजारो कुटुंबांचे पुनर्वसन अद्याप पूर्ण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, एकूण 9876 प्रकल्पग्रस्त खातेदारांपैकी 4289 जणांचे पुनर्वसन अद्याप झालेले नाही.
त्यापैकी 2895 खातेदारांना जमीन वाटप झालेले नाही, तर 1394 खातेदारांना अंशतः जमीन मिळाली आहे. पर्यायी जमिनींसाठी पसंती घेण्यात आलेली असतानाही प्रत्यक्ष वाटप प्रक्रिया पूर्णपणे ठप्प असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात 12 सप्टेंबर 2025 रोजी विभागीय आयुक्तालयात वरिष्ठ अधिकार्यांची निर्णायक बैठक पार पडली होती. तसेच 23 सप्टेंबर 2025 रोजी मदत व पुनर्वसन विभागाच्या उपसचिवांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथेही बैठक झाली होती.
या बैठकीत सातारा जिल्हाधिकारी कार्यालय केंद्र मानून विविध जिल्ह्यांत कॅम्प लावून जमीन शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयांची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाटण, जावळी, महाबळेश्वर, फलटण, कोरेगाव आदी तालुक्यांतील तसेच इतर जिल्ह्यांत विखुरलेल्या कोयना प्रकल्पग्रस्तांनी 23 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.
प्रत्यक्ष जमीन वाटप सुरू होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची भावना असून, शासनाने तातडीने कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून शंभर टक्के पुनर्वसनाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.





