सातारा – रिपाइंचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

सातारा – येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अल्ट्राटेक व जेके सिमेंट गोडाऊन असणाऱ्या ठिकाणी ठेकेदारांनी माथाडी भूमिपुत्र कामगारांना डावलून परप्रांतीय लोक कामासाठी आणले आहेत. या प्रकरणाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सातारा लोकसभा पक्ष निरीक्षक दादासाहेब ओवाळ यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दादासाहेब ओव्हाळ, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या निवेदनात म्हटले आहे की, एमआयडीसीमध्ये असणाऱ्या सिमेंट कंपन्यांमध्ये परप्रांतीय टोळ्या नाममात्र दरात कामासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे माथाडी भूमिपुत्र कामगारांना कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. या विषयाने प्रशासनाला निवेदने देवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र कामगार आयुक्त या संवेदनशील प्रकरणाकडे अजिबात लक्ष देत नाहीत.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भूमिपुत्र माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. संबंधितांसह कामगार आयुक्तांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दादासाहेब ओव्हाळ, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात आर्यन अडागळे, आनंदा गादीवार, नितीन बोतालजी, सुनील शिंगे आदी सहभागी झाले होते.
====================





