Satara : शिवनेरी साखर कारखान्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील जयपूर गणेश टेकडी येथील शिवनेरी शुगर लिमिटेड या खाजगी साखर कारखाने केलेल्या बेकायदेशीर प्रदूषणाच्या विरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अखेर कारखान्याच्या विरोधात कारवाई करत कारखान्याची २५ लाख रुपयांची बँक गॅरंटीची रक्कम जप्त केली आहे. पुणे येथील प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे यांनी या संदर्भातील आदेश पारित केला आहे, अशी माहिती सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी दिली.
महाराष्ट्र दिनी दि. १ मे रोजी शिवनेरी शुगर लिमिटेड या कारखान्याच्या विरोधात कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन करण्याचा इशारा सुतार यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी गुरुवारी दुपारी तक्रारदार आणि कारखानदार तसेच प्रशासकीय यंत्रणेतील खाते प्रमुखांची संयुक्त बैठक बोलावली होती. बैठकीच्या प्रारंभीच सातारा येथे प्रादेशिक अधिकारी सातपुते यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती दिली. यासंदर्भातील आदेश त्यांनी उपलब्ध करून दिला आहे.
दत्तात्रय सुतार यांनी कारखान्याच्या सांडपाण्यामुळे होत असलेल्या प्रदुषणाबद्दल सातत्याने आवाज उठवला होता. प्रशासकीय यंत्रणेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. वेळोवेळी प्रांताधिकारी अभिजीत नाईक, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध खाते प्रमुखांची भेट घेऊन तक्रारी अर्ज सादर करत कारवाईची मागणी केली होती.
सातारा येथील उप प्रादेशिक अधिकारी सातपुते यांनी कारखान्याच्या प्रदूषणाविषयी कारवाईचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला होता. त्यावर सुनावणीची प्रक्रिया देखील पार पडली. कारखान्याने नेमकी भूमिका स्पष्ट केली नाही, तसेच यापूर्वी त्यांच्याकडून प्रदूषण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंडळाने कारखान्याची बँक गॅरंटीची २५ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.





