Satara Politics: साताऱ्यात भाजपचे ‘मिशन २०२९’ सुरू! जयकुमार गोरे आणि शिवेंद्रसिंहराजेंनी आखला मोठा प्लॅन
Satara Politics: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धैर्यशील कदमांच्या विजयाने पक्षाला मिळाली नवी ताकद; सव्वा वर्षांवर आलेल्या जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपचे लक्ष.

Satara Politics – जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये भारतीय जनता पक्षाने आता आगामी विधानसभा निवडणूक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर व्यापक मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या साताऱ्यात भाजपने गेल्या काही वर्षांत आपले राजकीय अस्तित्व भक्कम केले असून आता संपूर्ण जिल्ह्यावर संघटनात्मक पकड आणखी मजबूत करण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्ह्यातील राजकारणात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपची पुढील टप्प्यातील राजकीय व्यूहरचना आकार घेत आहे. कराड दक्षिणचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे तसेच कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यासह पक्षाची जिल्ह्यातील ताकद अधिक संघटित करण्यावर भर दिला जात आहे.
सातारा- सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपने धैर्यशील कदम यांना निवडून आणत आपला राजकीय दावा अधिकच मजबूत करताना पक्षाला आणखी एक आमदार मिळवून दिला आहे. राज्यात विधनापरिषदेच्या निवडणुकीत 17 पैकी भाजपचे 11 आमदार निवडून आल्याले. त्यात साताऱ्यालाही नवी तकाद मिळाली आहे. आगामी २०२९ विधानसभा निवडणुकीबरोबरच संभाव्य मतदारसंघ पुनर्रचनेवरही भाजपच्या ‘थिंक टँक’ची बारकाईने नजर असल्याचे सांगितले जाते.
जिल्हाभर सुमारे तीन हजार केंद्रप्रमुख आणि बूथस्तरीय समित्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात आले असून प्रत्येक केंद्रप्रमुखाच्या कामाचा नियमित आढावा घेतला जात आहे. संघटनात्मक बैठका, त्यांचे अहवाल आणि प्रदेश पातळीवरील देखरेखीमुळे पक्षाने निवडणूक नसतानाही निवडणुकीसारखी तयारी सुरू ठेवल्याचे चित्र आहे. येत्या सव्वा ते दीड वर्षांत होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीही भाजपने स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांमध्ये भाजपचे वर्चस्व वाढविण्यावर भर दिला जात असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक विस्ताराला वेग देण्यात येत असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. विकासकामांचा अजेंडा जनतेपर्यंत पोहोचविणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात संघटनात्मक जबाबदाऱ्या निश्चित करणे,
नियमित आढावा घेत बैठकांद्वारे कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे आणि स्थानिक नेतृत्वाला अधिक जबाबदाऱ्या देणे, अशा बहुआयामी रणनीतीवर भाजप काम करत असल्याचे दिसत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.






