सातारा । फराळाच्या निमित्ताने राजकीय चर्चा; उच्चांकी मताधिक्यासाठी साखरपेरणी

कोयनानगर – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दिवाळीत चार दिवसांच्या सुट्टीमुळे ब्रेक लागला होता. प्रचार थंडावल्याने दरवर्षी घेतल्या जाणार्या दिवाळी फराळाचे आयोजन दौलतनगर येथील साखर कारखाना कार्यस्थळी करून, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उच्चांकी मताधिक्यासाठी साखरपेरणी केली. हा कार्यक्रम ‘फराळ पे राजकीय चर्चा’ असा झाला.
शंभूराज देसाई हे गेल्या दहा वर्षांपासून दिवाळीत फराळाचा कार्यक्रम घेतात. त्याला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाही लोकनेते बाळासाहेब देसाई उद्योग, शिक्षण समूह व शिवदौलत बँक यांच्यावतीने दिवाळी फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी देसाई यांनी कार्यकर्त्यांसमवेत फराळाचा आस्वाद घेतला.
आपल्या माणसांबरोबर दिवाळी साजरी करणे, हा आनंद देणारा अनुभव असतो, अशी भावना व्यक्त करून, त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ऐन निवडणूक काळात दिवाळी आल्याने, कार्यकर्त्यांनी चिवड्याबरोबर खमंग राजकीय गप्पा मारल्या. याप्रसंगी कोल्हापूर येथील स्वरनिनाद समूहाच्या मराठी गीतांच्या मैफिलीने कार्यकर्त्यांना मंत्रमुग्ध केले.





