पाटण विधानसभा मतदारसंघ विकासकामांनी जोडून ठेवला आहे !

सणबूर – पाटण विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून गेली दहा वर्षे राज्य आणि केंद्र स्तरावरून जास्तीत जास्त निधी मतदारसंघात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गाव-वाड्यांमध्ये विकासकामे केली. गावा-गावांमध्ये रस्ते आणि पिण्याचे पाणी आणले. विकासकामांवर हा मतदारसंघ आम्ही जोडून ठेवला आहे. ही परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे, असे सांगत यंदाची निवडणूक विकासाच्या कामांवर लढवत असल्याचे प्रतिपादन शंभूराज देसाई यांनी केले.
मंगळवारी तांबवे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शंभूराज देसाई यांच्या प्रचाराची जाहीर संभा संपन्न झाली. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदार बंधू-भगिनींशी शंभूराज देसाई यांनी संवाद साधला.
यावेळी मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई यांच्यासह प्रदीप पाटील, मिलिंद पाटील, दिलीपराव चव्हाण, प्रकाश पाटील, हणमंतराव चव्हाण, बाळासाहेब पाटील, अशोकराव पाटील, सुरेश पानसकर, संतोष गिरी, पांडुरंग नलवडे, आनंदा कळके, प्रभाकर शिंदे, अशोक माने, संदीप सावंत, संदीप साळुंखे, विश्वास कणसे, शिवाजीराव गायकवाड, तुकाराम डुबल, प्रताप सूर्यवंशी, लक्ष्मण देसाई, जयवंत जाधव, सचिन पवार, संजय मुळगावकर, जालिंदर पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शंभूराज देसाई म्हणाले, जिथे आज ही सभा होत आहे तो तांबवे विभाग विकासकामे करणाऱ्यांची पाठराखण करणारा आहे. हा मतदारसंघ आम्ही विकासकामांनी जोडून ठेवला आहे. ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे. ग्रामीण भागात सर्व सोयीसुविधा पुरविल्या तरच आपण शहरासोबत स्पर्धा करू शकणार आहोत. याची जाणीव ठेवूनच मतदारसंघात आम्ही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. आम्ही गेल्या पाच वर्षांत केलेल्या विकासकामांचे प्रगतिपुस्तक मतदारसंघातील जनतेसमोर ठेवले आहे.
पुढे ते म्हणाले, महायुतीचे सरकार आले आणि या सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची संधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मिळालेल्या संधीचे सोने करत जिल्ह्याचा आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून विकासकामे केली. जादाचा निधी पाटण विधानसभा मतदारसंघात आणण्याचे काम गेल्या अडीच वर्षांत केले. जलजीवन मिशनअंतर्गत गावागावांत पाणी पुरवठा केला. मतदारसंघातील २२९ गावे जलजीवन मिशनअंतर्गत समाविष्ट केली. मागच्या पाच वर्षांत अनेकदा आपत्तीसदृश स्थिती आली, पण सर्वप्रथम मायबाप जनतेच्या मदतीला धावून गेलो. ज्यांना लोकांची आठवण फक्त निवडणुकीच्या काळात होते, त्यांना यावेळी धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे सांगत आम्ही करत असलेल्या विकासाच्या राजकारणाला साथ द्या, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी यावेळी मतदार बंधू-भगिनींना केले.





