Satara : लालपरीच्या भाडेवाढीचा प्रवाशांना आर्थिक फटका

सातारा : एसटी महामंडळाने सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची १५ टक्के भाडेवाढ केल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. इंधनाची दरवाढ, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व अन्य साहित्याच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे भाडेवाढ केल्याचे महामंडळाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
यापूर्वी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा तीन वर्षानंतर एसटीची भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. मासिक पासमध्येही वाढ होणार असल्याने भाडेवाढीला विरोध होताना दिसत आहे.
एसटी महामंडळाच्या भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. यामध्ये साध्या गाड्या, इलेक्ट्रिक व सेमी गाड्यांचे दर वेगवेगळे आहेत. सातारा ते स्वारगेट या सर्वाधिक महसूल मिळणार्या मार्गावर इलेक्ट्रिक बसचा जुना दर २५५ रुपये तर नवीन दर २८६ रुपये आहे. भाडेवाडीचा निर्णय घेताना सहा किलोमीटरला साध्या गाड्याचे दर दहा रुपये पाच पैसे, सेमी गाड्यांना १३ रुपये ६५ पैसे, इलेक्ट्रिक गाड्यांना १३ रुपये ८० पैसे असा दर वाढविण्यात आला आहे.
एसटी महामंडळाने तिकिट दरात भाडेवाढ केल्याने सर्वासामान्य नागरिकांच्या खिशाला चाट बसली आहे. दरम्यान एस.टी’च्या तिकिट दरात १५ टक्के वाढ केल्याने सर्वच प्रकाराच्या पासेसच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे दररोज सातारा- पुणे, सातारा- कराड व जिल्हाभरात इतर मार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या महिना पासेसच्या दरातही वाढ झाली आहे.
मार्ग जुने तिकिट दर नवे तिकिट दर (साध्या गाडीचे दर)
सातारा- स्वारगेट १७० १९७
सातारा- कोल्हापूर १८५ २१२
सातारा- नाशिक ४७० ५४४
सातारा- बोरिवली ४२५ ४९३
सातारा- अक्कलकोट ४१० ४७३
सातारा- सोलापूर ३६० ४१३
सातारा- सांगली १८५ २१२
सातारा- कराड ८० १२४
सातारा- वडूज ९० १०२
सातारा- पाटण ९५ ११२
सातारा- महाबळेश्वर १०५ १२२





