Satara News – सातारा जिल्हा ग्राहक पंचायतच्या सदस्यांनी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे भेट देऊन ऑटो रिक्षा चालकांकडून करण्यात येत असलेल्या ऐच्छिक भाडेवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांची भेट घेऊन मीटरप्रमाणे भाडे आकारणी सक्तीने लागू करण्याची मागणी करण्यात आली. या बैठकीस सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे हेही उपस्थित होते. ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी मिटर भाडे सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी , अशी सूचना केली.यावेळी पोलिस विभागानेही या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची भूमिका मांडली. पूर्वी मीरा बोरवणकर यांनी केलेल्या कारवाईची आठवण करून देत ग्राहक पंचायतीच्या जिल्हाध्यक्षा सुनीता राजे घाटगे यांनी अशाच प्रकारची ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. बैठकीत रिक्षाचालकांसाठी ड्रेस कोड असावा, अशी मागणी पंचायतीचे नंदकुमार काटे यांनी मांडली. तसेच प्रत्येक रिक्षामध्ये चालकाचे नाव व संपर्क क्रमांक स्पष्टपणे दर्शविणे बंधनकारक करावे, असा आग्रह धरण्यात आला. काही ठिकाणी अतिजुनी व निकृष्ट स्थितीतील रिक्षा वापरल्या जात असल्याची बाबही निदर्शनास आणून देण्यात आली.याशिवाय शालेय बस संदर्भातील नियमांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी व त्याबाबत नियमित पाहणी करण्यात यावी, अशी सूचना किरण बोळे यांनी केली. दरम्यान, रिक्षा संघटनेबरोबर समन्वय साधून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.ग्राहकांच्या हितासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्राहक पंचायतच्यावतीने व्यक्त करण्यात आली. बैठकीला ग्राहक पंचायतचे मेजर घनवट, आर. के. जाधव, अभिजीत खुरासणे, शहा, प्रभाकर मोरे, नंदकुमार काटे उपस्थित होते.