Satara News: उदयनराजेंचा ‘तो’ शिलेदार भूषवणार उपनगराध्यक्षपद; आज साताऱ्यात होणार मोठी घोषणा

प्रभात वृत्तसेवा
सातारा – सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मनोज शेंडे यांची निवड निश्चित झाल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. गुरुवारी होणाऱ्या पहिल्या सर्वसाधारण सभेत पीठासन अधिकारी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडून या नावाची घोषणा केली जाणार आहे.
भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रतोद पदासाठी एड. निशांत पाटील तर सभागृह नेते पदासाठी अविनाश कदम यांची नावे चर्चेत आहेत. दोन्ही नेत्यांच्या मान्यतेने या पदांची निवड अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया दुपारी १२ वाजल्यापासून सुरू केली जाणार आहे.
यामध्ये 12 ते सव्वा बारा यादरम्यान अर्ज दाखल करणे सव्वा बारा ते साडेबारा या दरम्यान अर्ज छाननी त्यानंतर अर्ज माघारीसाठी अर्ध्या तासाची वेळ असून त्यानंतर दुपारी दीड वाजता पिठासन अधिकारी नगराध्यक्ष अमोल मोहिते उपनगराध्यक्षांच्या नावाची निवड जाहीर करणार आहेत.स्वीकृत सदस्य निवडीची प्रक्रिया सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवसापासूनच राबवण्यास सुरुवात झाली होती.
विहित नमुन्यातील अर्ज तसेच आवश्यक प्रमाणपत्र ना हरकत दाखले याबाबतची सर्व प्रक्रिया मुख्याधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रांत आशिष बारकुल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी छाननी केल्यानंतर ती लखोटाबंद नावे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे पाठवली जाणार आहेत. उपनगराध्यक्ष निवडीनंतर स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा केली जाणार असून त्यानंतर विषय समित्यांच्या सदस्य संख्यांची निश्चित केली जाणार आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी नावे निश्चित
सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी यांची सर्वसाधारण सभेच्या आदल्या दिवशी स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची गडबड सुरू होती. यामध्ये स्वीकृत सदस्य पदासाठी सातारा विकास आघाडी यांच्याकडून शंकर माळवदे आणि पंकज चव्हाण तसेच नगर विकास आघाडीच्यावतीने सुनील भंडारी रवी पवार आणि रीना भणगे तर खासदार गटाकडून शंकर माळवदे व पंकज चव्हाण ही नावे निश्चित झाल्याची माहिती आहे.
मनोज शेंडे यांच्या नावाला पसंती
विकास कामांचा झपाटा, उत्तम जनसंपर्क आणि आघाडी एक हाती सांभाळण्याची क्षमता यामुळे मनोज शेंडे यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रतोद पदासाठी खासदार गटाचे अनुभवी नगरसेवक निशांत पाटील यांच्या नावाला पसंती असून गटनेते म्हणून अविनाश कदम यांना संधी दिली जाणार आहे. भाजपच्या अधिकृत सूत्रांनी याला दुसरा दिला नसला तरी या निवडी निश्चित मानल्या जात आहेत.





