Satara News : कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक ठप्प! वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या

कोयनानगर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा कराड-चिपळूण राज्य महामार्ग यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा संकटात सापडला आहे. वाजेगाव येथे भराव खचून वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर सोमवारी रात्रभरच्या मुसळधार पावसामुळे शिरळ-मारूल दरम्यानचा वळण रस्ता पाण्याखाली गेला. परिणामी, गेल्या 24 तासांपासून हा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून, दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात हा मार्ग वाहतुकीसाठी अडचणीचा ठरतो, आणि यंदाही हीच परिस्थिती पुनरावृत्ती झाली आहे. प्रशासनाने अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घातली असून, लहान वाहनांना मर्यादित स्वरूपात परवानगी दिली आहे. मात्र, वळण रस्ता पाण्याखाली गेल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. ओलेकर आणि मंडलाधिकारी संजय जंगम यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले असून, बुधवारी हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रांताधिकारी सोपान टोम्पे यांनी सांगितले की, “ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण न केल्याने मार्ग पूर्णपणे तयार झालेला नाही. याबाबत ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आम्ही स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून काम पूर्ण करत आहोत.”
दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गावर भराव खचणे, तात्पुरते वळण रस्ते वाहून जाणे आणि वाहतूक ठप्प होणे हे प्रकार घडतात. मात्र, कायमस्वरूपी उपाययोजनांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल वाढत आहेत. प्रशासन केवळ घटना घडल्यानंतरच हालचाली करते, अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.





