Satara News : सातारकरांच्या जिव्हाळ्याच्या उद्यानाची दैनावस्था; ‘या’ ऐतिहासिक बागेचे अस्तित्व धोक्यात?
Satara News : खेळणी मोडकळीस अन कचऱ्याचे साम्राज्य; सातारा नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ऐतिहासिक उद्यानाची अवस्था बिकट.
Satara News – शहरातील राजवाडा परिसरातील प्रसिध्द श्री. छ. प्रतापसिंह महाराज उद्यानात सोयीसुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. उद्यानातील खेळणी जुनी व मोडकळीस आली आहेत. उद्यानात कच-याचे ढीग लागले आहेत. बैठक व्यवस्था नसल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. तर उद्यानातील झाडेही सुकून गेल्याने एकेकाळी गर्दीचे ठिकाण असलेली ही बाग ओस पडली आहे.
श्री. छ. प्रतापसिंह महाराज उद्यानाकडे अनेक वर्षापासून सातारा नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. उद्यान राजवाडा चौपाटीच्या समोर असल्याने लहानमुलांसह पालक गर्दी करतात. परंतु बागेतील खेळणी ही जुनी झाली असून मोडकळीस आली आहेत. या खेळण्यावर खेळताना लहान मुलांना इजाही होउ शकते.
तसेच बागेत ज्येष्ठांना, महिलांना बसण्याची सोय नसल्याने त्यांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. उद्यानात ठिक ठिकाणी कच-याचे ढिग लागले आहेत. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. झाडेही पाण्याअभावी सुकून गेली आहेत. बसायला लॉन नाही. सोयीसुविधांचा अभाव निर्माण झाल्याने अनेकांनी उद्यान येण्याकडे पाठ फिरवली आहे.
रात्री वेळी लाईटची सोय नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडूशकतो. येथे सुरक्षा रक्षक नाही. दुचाकी पार्किग रस्त्यालगत करण्यात येत असल्याने परिसरात सततची वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार असून गर्दी वाढणार आहे. त्या अनुशंगाने लवकरात लवकर उद्यानाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
सातारा शहरात आता अनेक ठिकाणी नवीन उद्याने विकसित झाली आहेत. मात्र, राजवाड्यासमोरील श्री. प्रतापसिंह महाराज उद्यान अनेक पिढ्यांच्या बालमनावर कोरलेली गोड आठवण आहे. राजवाडा चौपाटी व आणि प्रतापसिंह महाराज उद्यान हे सातारकरांच्या जिव्हाळ्याची ठिकाणे. आता चौपाटी सुरु असली एकेकाळी अबालवृध्दांनी गजबजून जाणारे उद्यान मात्र देखभालीअभावी कोमेजून गेले आहे.
पुन्हा गतवैभव मिळू शकेल का
श्री. छ. प्रतापसिंह महाराज उद्यान हे सर्वांसाठी आकषर्णाचा केंद्रबिंदू होते. उन्हाळ्यात गर्द झाडांची सावली अनेकांसाठी सहारा बनत असे. सायंकाळ झाली की पक्ष्यांच्या किलबिलाटात बालगोपाळांची खेळण्याची गडबड. आरडाओरडा, झोपाळ्यावर खेळण्याची उत्सुकता, हातात भेळीचा पुडा आणि आईस्क्रीमची चव चाखत उद्यान, रेल्वेत बसण्याचा आनंद आणि उद्यानाचे ते गतवैभव पुन्हा मिळू शकेल का, असा सवाल सातारकरांच्या मनात आहे.






