Satara News : आणखी २२ शिक्षकांना निलंबनाची नोटीस

सातारा : प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत दिलेल्या कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने ५८१ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयामार्फत सुरू केली आहे. चार टप्प्यांतील तपासणीत ४४ प्रमाणपत्र अयोग्य ठरली होती तर २१ जण तपासणीस गैरहजर होते. पाचव्या टप्प्यात १६ शिक्षकांची प्रमाणपत्र अयोग्य ठरली असून ६ जण तपासणीस गैरहजर होते.
प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी पाच टप्प्यांतील ६० अयोग्य व २७ गैरहजर शिक्षकांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्यांमध्ये अनेक शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी दिव्यांग प्रमाणपत्रासह अन्य आजारासंदर्भात कागदपत्रे जोडली आहेत.
प्रशासनाकडे तक्रार आल्याने कागदपत्र पडताळणीसाठी गठित समितीने ५८१ शिक्षकांची जिल्हा रुग्णालय व छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयास दिली. पहिल्या टप्प्यात ७९ पैकी ७५ शिक्षकांची तपासणी झाली. ५७ प्रमाणपत्र योग्य तर १२ अयोग्य ठरली. ४ शिक्षक तपासणीस गैरहजर होते. दुसऱ्या टप्प्यात ८३ पैकी ७६ शिक्षकांची तपासणी झाली. ६२ प्रमाणपत्र योग्य तर १३ अयोग्य ठरली.
७ शिक्षक तपासणीस गैरहजर होते. तिसऱ्या टप्प्यात ५३ पैकी ४९ शिक्षकांची तपासणी होऊन ३४ प्रमाणपत्र योग्य तर ११ अयोग्य ठरली. ४ शिक्षक तपासणीस गैरहजर होते. चौथ्या टप्प्यात ५५ पैकी ४९ शिक्षकांची तपासणी झाली. ४० प्रमाणपत्र योग्य तर ८ अयोग्य ठरली.
६ शिक्षक तपासणीस गैरहजर होते. पाचव्या टप्प्यात ५७ पैकी ५१ शिक्षकांची तपासणी होऊन ३२ प्रमाणपत्रे योग्य तर १६ अयोग्य ठरली. ६ शिक्षक तपासणीस गैरहजर होते. दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीत निलंबनाची नोटीस बजावलेल्यांपैकी काही शिक्षकांनी खुलासे प्रशासनाकडे सादर केले असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारित शाळांमधील ५८१ पैकी ३२७ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी पूर्ण झाली हे. ८७ शिक्षकांना आतापर्यंत निलंबनाची नोटीस बजावली आहे. प्रमाणपत्रात छेडछाड केल्याच्या आरोपावरुन तीन शिक्षकांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– अनिस नायकवडी (शिक्षणाधिकारी, प्राथमिक)





