Satara News: सातारा, वडूज व वाई येथे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू शासनाची मान्यता

प्रभात वृत्तसेवा
सातारा – शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना नावनोंदणी करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सातारा व वडूज येथे खरेदी केंद्र सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दि. 30 ऑक्टोबर 2025 पासून सुरु करण्यात आली आहे. प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया दि. 15 नोव्हेंबर 2025 पासून सुरु करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठी शासनाकडून हमीभाव शेतमाल खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याची मुदत दि. 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. शासनाने 2025-26 वर्षाकरिता निश्चित केलेल्या आधारभूत किमतीने 5 हजार 328 रुपये प्रती क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यासाठी राज्य पणन महासंघ व नाफेडमार्फत कोरेगाव, सातारा,
फलटण, वाई व कराड येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाना, मसूर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेस केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली असून नव्याने वडूज (ता. खटाव) येथे खरेदी विक्री संघ, सातारा येथे जिल्हा मध्यवर्ती ग्राहक संघ लि. सातारा व कवठे ता. वाई येथे समृध्दी सहकारी संस्था या तीन केंद्रास मान्यता मिळाली आहे.
त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या 9 झाली आहे.कोरेगाव, फलटण, वाई व मसूर येथील केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरू झाली असून आतापर्यंत कोरेगाव केंद्रावर 339 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 333 शेतकऱ्यांची 4070 क्विंटल, फलटण केंद्रावर 211 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 192 शेतकऱ्यांनी 2347 क्विंटल,
वाई केंद्रांवर 175 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 148 शेतकऱ्यांची 1520 क्विंटल व मसूर केंद्रावर 92 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 82 शेतकऱ्यांची 988 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे. सातारा जिल्हयात एकुण 755 शेतकऱ्यांकडून एकुण 8926 क्विंटल खरेदी झालेली आहे. तसेच पणन मंडळाकडुन मंदप्रभा फार्मर प्रोडयुसर कंपनी लि. (शिखर शिंगणापुर),
संकल्पपुर्ती ॲग्रो फार्मर प्रोडयुसर कंपनी (हिवरे ता. कोरेगाव), येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी वर्धनगड (ता. खटाव) या केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरु आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पणन अधिकारी हनुमंत पवार, संबंधित खरेदी विक्री संघ, तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. सुद्रिक यांनी केले आहे.





