Satara News : सातारकरांच्या अंगाची लाहीलाही! उन्हाचा तडाखा अन् महावितरणचा झटका; नेमकं काय बिघडलं?
Satara News : कडक उन्हाच्या तडाख्यात दुपारी ४ नंतर वीज खंडित होत असल्याने नागरिक हैराण; राजवाडा परिसरात तब्बल अडीच तास वीज गायब.

Satara News – सातारा शहर परिसरात सध्या हवामानाची दोन टोकांची स्थिती देत असताना, महावितरणचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. दिवसभर कडक उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी अचानक ढगाळ हवामान होत आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
विजांचा कडकडाट व जोरदार वारे सुरू झाल्यावर दुपारी 4 नंतर सुरू होणार्या अघोषित भारनियमनाने सातारकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरात दुपारी 4 च्या सुमारास जोरदार वारे सुरू होत आहे. नेमका त्याच वेळी वीजपुरवठा खंडित होणे नित्याचे झाला आहे. हवेत कमालीचा उकाडा असताना, तास ते दीड तास अघोषित भारनियमन होत आहे.
त्यामुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी तर राजवाडा परिसरात तब्बल अडीच तास वीज गायब झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केली. महावितरण कंपनीकडून मात्र नेहमीप्रमाणे तीच ती तांत्रिक कारणे दिली जात आहेत. वार्यामुळे काही ठिकाणी उच्चदाबाच्या तारांवर ट्रिपिंग होत असल्याचे प्रतापगंज पेठेतील कार्यालयातून सांगण्यात येते.
मात्र, ही समस्या नवीन नसताना, त्यावर ठोस उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शहरातील वीजवाहिन्या जुन्या आणि अजूनही उघड्यावर लटकलेल्या आहेत. भूमिगत वीजवाहिन्यांचा प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहे. त्यामुळे जोरदार वारे वाहत असताना किंवा प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती पुन्हा उद्भवत आहे.
उन्हाळ्यात पाणीकपातीला सामोरे जाणार्या सातारकरांची अवस्था या अघोषित भारनियमनामुळे अधिक बिकट होत आहे. वीजपुरवठा खंडित होताच, पंखे आणि वातानुकूलन उपकरणे बंद पडतात. उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने, नागरिक त्रस्त होत आहेत. डीहायड्रेशन, उष्माघातासारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
एकीकडे हवामानाचा तडाखा आणि दुसरीकडे महावितरणचा निष्काळजीपणा या दुहेरी संकटात सातारकर सापडले आहेत. तात्पुरत्या कारणांचा पाढा पुन्हा पुन्हा वाचण्यापेक्षा दीर्घकालीन उपाययोजना कधी राबवणार, याचे उत्तर महावितरण कंपनीने द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.






