Electricity Demand – राज्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, त्याचा थेट परिणाम विजेच्या मागणीवर दिसून येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे वातानुकूलित यंत्रणा आणि कुलरचा वापर वाढल्याने दि. २१ एप्रिल रोजी महावितरणच्या विजेची मागणी २६ हजार ७४४ मेगावॅटवर पोहोचली आहे. यापूर्वी दि. १४ जानेवारी रोजी मागणीने २७ हजार १८७ मेगावॅटचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. आगामी दिवसांत हा उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने येत्या काळात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर विजेची मागणी आणखी वाढून यंत्रणेवर ताण येऊ नये, यासाठी महावितरणने वीज ग्राहकांना विजेचा वापर जपून आणि काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक वीज केंद्रांमधून ७ हजार १७५ मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. यामध्ये कोराडी, नाशिक आणि चंद्रपूर यांसारख्या प्रमुख केंद्रांचा समावेश आहे. केंद्रीय प्रकल्पांतून ४ हजार ७४७ मेगावॅट वीज राज्याला मिळत आहे. कोयना आणि इतर जलविद्युत प्रकल्पांतून २ हजार १७ मेगावॅट वीज मिळवून राज्याने टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. सौर आणि पवन ऊर्जासारख्या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून देखील विजेची उपलब्धता वाढत आहे. सौरऊर्जेतून २ हजार ४५३ मेगावॅट, तर पवन उर्जेतून २५८ मेगावॅट वीज ग्रीडमध्ये येत आहे. साखर उद्योगांतील सहवीजनिर्मिती प्रकल्पातूनही २४४ मेगावॅट वीज सध्या महावितरणला मिळत आहे मागणी- पुरवठ्याचा ताळमेळ राज्यात विजेचा तुटवडा भासू नये आणि ग्राहकांना अखंडित पुरवठा मिळावा, यासाठी महावितरणकडून पॉवर एक्स्चेंज मधून ६२५ मेगावॅट जादा वीज खरेदी करण्यात येत आहे. योग्य नियोजनामुळे सध्या वाढत्या मागणीच्या काळातही वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आले आहे, असे महावितरणच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.