Satara News : लोणंद नगरपंचायतीच्या सभेत डॉल्बी बंदीचा ठराव

लोणंद : लोणंद नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा बुधवारी नगरपंचायत कार्यालयात नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत डॉल्बीवरील बंदीसह शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुव्यवस्थेसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी सभेस उपस्थित होते. मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सभेसमोर सर्व प्रस्ताव मांडले.
शहरातील सिटी सव्र्व्हे नं. २६४ मधील सरकारी जागेवर छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांची स्मारके उभारण्याचा ठराव करण्यात आला. या जागेची मोजणी करून, स्मारक उभारणीसाठी एजन्सी नेमण्याचे नियोजन करण्याचे ठरवण्यात आले.
लोणंद-सातारा रस्ता (एनएच९६५डीडी आणि एनएच९६५डी) लोणंद शहरातून जाताना, खाजगी दुकाने किंवा मालमत्ता अधिग्रहित न करता काम करण्याचे निर्दे श, नगरपंचायतीच्या मिळकत कर नोंदीवर कर्ज/गहाणखत नोंदवण्यासाठी ०.१५ टक्के ते ०.३० टक्के इतका दर निश्चित, व्यापारी महासंघ, मेडिकल असोसिएशन व नागरिकांच्या मागणीवरून शहरात डीजे व डॉल्बी वाजवण्यास बंदी, पोलीस प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, यासाठी पत्रव्यवहार करण्याचा ठराव करण्यात आला.
या निर्णयांना सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. सभेस बांधकाम समितीच्या सभापती सुप्रिया शेळके, पाणीपुरवठा समितीचे सभापती सचिन शेळके, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, शिवाजीराव शेळके-पाटील, भरत शेळके, भरत बोडरे, माजी नगराध्यक्ष सीमा खरात, रशिदा इनामदार, दीपाली शेळके, राजश्री पाटील, तृप्ती घाडगे, दीपाली संदीप शेळके, ज्योती डोणीकर, प्रवीण व्हावळ, आनंदराव शेळके-पाटील, स्वीकृत नगरसेवक सागर शेळके आणि सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या निर्णयांमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता, पर्यावरण आणि नागरी सुविधांचा लक्षणीय विकास होणार आहे, असे मधुमती गालिंदे यांनी सांगितले. या कामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने होईल, असे आश्वासन मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिले.





