Lonand News – कोणतीही करवाढ न करता लोणंद नगरपंचायतीचा ९७.८७ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी यांच्या अध्यक्षतेखाली लोणंद नगरपंचायतीची अर्थसंकल्पीय सभा नगरपंचायतीच्या सभागृहात नुकतीच झाली. या सभेमध्ये सन २०२६- २७ करिता ९७ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ५ लाख ९० हजार रुपये रक्कम पुढील वर्षाकरिता शिल्लक ठेवण्यात आली. या अर्थसंकल्प सभेदरम्यान सर्व नगरसेवकांनी आवश्यक नवीन तरतुदी सुचविल्या. या अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग, महिला व बाल कल्याण, दुर्बल आर्थिक घटक यांबरोबर आजी माजी सैनिकांच्या शौर्याचा सन्मान म्हणून सैनिक कल्याणकारी योजनेसाठी तरतूद करण्यात आली. तसेच नागरिक व युवांमध्ये खेळासाठी प्रोत्साहनपर योजना व रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीकरिता तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदींमध्ये नदी व ओढे यांचे पुनरुज्जीव 10 लाख, सौर ऊर्जा प्रकल्प 1 कोटी, घनकचरा विकास आराखडा प्रकल्प 1 कोटी, पाणीपुरवठा योजना 43 कोटी, अहिल्याबाई होळकर पुतळा सुशोभिकरण 50 लाख, सांडपाणी /मैला प्रक्रिया केंद्र 11.5 कोटी, नमो उद्यान 1 कोटी, शॉपिंग सेंटर उभारणी 2 कोटी, स्मशानभूमी सुशोभिकरण 4 कोटी यांचा समावेश आहे. लोणंद शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असून खेमावती नदी तसेच शहरातील इतर ओढ्यांचे महत्व ओळखून त्यांच्या पुनरुज्जीवन करण्याकरीता तरतूद सुचवून त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गणीभाई कच्छी यांनी यावेळी सांगितले. लोणंद नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग घेतला असून या अभियानांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. लोणंद घनकचरा प्रकल्पाकरीता आवश्यक असणारा जागेचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून याबाबत आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणून प्रशासनामार्फत या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी सांगितले. यावेळी बांधकाम समिती सभापती सुप्रिया शेळके, पाणीपुरवठा सभापती सचिन शेळके, नगरसेवक भरत शेळके, रवींद्र क्षीरसागर, भरत बोडरे, सीमा खरात, रशिदा इनामदार, सागर शेळके, दीपाली नि. शेळके, दीपाली सं. शेळके, राजश्री शेळके, ज्योती डोणीकर, कार्यालय अधीक्षक मयूरी दिसले, लेखापाल अमोल पवार व सभा कामकाज लिपिक विजय बनकर उपस्थित होते.