Satara News : आरक्षण सोडतीची प्रक्रिया सोमवारी ; अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीयांसाठी जागा निश्चित होणार

प्रभात वृत्तसेवा
सातारा – महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील तरतुदीनुसार व महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम, २०२५ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत पध्दतीने कार्यवाही करण्याकरिता जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी दि. १३ रोजी विशेष सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली.
त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी११.३० वाजता होणार आहे. त्याचदिवशी जिल्ह्यातीलपंचयात समितीमध्ये आरक्षण सोडत होईल. या सोडतीचा कार्यक्रम सर्व ठिकाणी दि. १३ रोजी सकाळी ११.३० वाजता पुढीलप्रमाणे होणार आहे. खंडाळा पंचायत समिती- खंडाळा तहसील कार्यालय, फलटण पंचायत समिती- सजाई गार्डन मंगल कार्यालय, जाधववाडी (फ), माण पंचायत समिती-तहसील कार्यालय, दहिवडी सभागृह.
खटाव पंचायत समिती- पंचायत समिती सभागृह, कोरेगाव पंचायत समिती- तहसील कार्यालय, कोरेगाव, वाई पंचायत समिती- देशभक्त किसन वीर सभागृह, वाई पंचायत समिती, महाबळेश्वर पंचायत समिती- मध संचालनालय, महाबळेश्वर, जावळी पंचायत समिती- पंचायत समिती सभागृह, मेढा, सातारा पंचायत समिती- अभयसिंहराजे भोसले सभागृह, पंचायत समिती, सातारा, पाटण पंचायत समिती- लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी संकुल, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पाटण, काळोली.कराड पंचायत समिती- यशवंतराव चव्हाण सभागृह (टाऊन हॉल).जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीतील सभेस हजर राहण्याची इच्छा असणाऱ्यांनी या वरील ठिकाणी व वेळी हजर राहवे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.





