Satara News : चाफळ परिसरात दुर्मिळ प्रजातीचे कासव जप्त

सातारा : चाफळ फाटा ते माजगाव फाटा तालुका पाटण यादरम्यान मैत्री हॉटेल परिसरात स्थानिक गुन्हे शाखा व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे कारवाई करून पाडळोशी ता. पाटण येथील गणेश प्रवीण चव्हाण याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुर्मिळ प्रजातीचे कासव जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना एक जण चाफळ रोडवर चोरीची मोटरसायकल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे त्यांच्या पथकाने चाफळ फाटा ते माजगाव फाटा या रस्त्यावरील मैत्री पार्क या हॉटेलजवळ सापळा रचला. तेव्हा संशयित एक जण मोटार सायकल घेऊन येत असताना पोलीस पथकाने त्याला हटकले व मोटारसायकल कोणाची आहे ? याबाबत विचारणा केली.
संशयिताने ही मोटरसायकल सातारा एमआयडीसी येथून चोरल्याची कबुली दिली. हँडलला एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये वन्यजीव आढळून आला. पोलिसांनी ते तपासले असता त्यामध्ये वनविभागाने 1972 च्या कायद्यानुसार संरक्षण दिलेल्या वन्यजीव यादीतील दुर्मिळ प्रजातीची कासव आढळून आले. मोटार सायकल व कासव दोन्ही जप्त करून उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोटारसायकल चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
या कारवाईत मुनीर मुल्ला, अमित झेंडे, हसन तडवी, अमृत शिंदे, रोहित तोरस्कर, नवनाथ कदम,गणेश भोसले, सचिन जगताप, श्रीधर माने, राजू कोळी, प्रशांत पवार तसेच वनविभागाचे अधिकारी सुहास भोसले, रमेश जाधवर, संतोष जाधवर यांनी सहभाग घेतला होता.





