Satara News : पूर्ववैमनस्यातून झालेल्या थरारक खुनाचा पुसेगाव पोलिसांकडून छडा; मुख्य आरोपींना अटक
खटाव तालुक्यातील (Satara News) भांडेवाडी गावात पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आणखी तिन्ही मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात पुसेगाव पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे.

Satara News : खटाव तालुक्यातील (Satara News) भांडेवाडी गावात पूर्ववैमनस्यातून एका १९ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून करून फरार झालेल्या आणखी तिन्ही मुख्य आरोपींना जेरबंद करण्यात पुसेगाव पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे.
१६ मे २०२६ रोजी घडलेल्या या थरारक घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले होते. यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती, तर उर्वरित तीन आरोपींना सिद्धेश्वर कुरोली परिसरातून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना उद्या दिनांक ११ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घरगुती वादातून कुरापत अन् थरारक हत्याकांड
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भांडेवाडी गावातील (Satara News) गाडेबाबा मंदिरासमोर १६ मे रोजी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ही रक्ताळलेली घटना घडली. फिर्यादी अभय काळे, त्यांचा भाऊ होश झाकीर काळे आणि चुलत भाऊ अभिजीत काळे हे रस्त्यावरून जात असताना आरोपींनी त्यांना गाठले. “तू आमची चुलती प्रतिमा हिला आमचा चुलत भाऊ अमर याच्यासोबत नांदू का देत नाहीस, तू तिला माहेरी का घेऊन जातोस?” असा जुना राग मनात धरून आरोपींनी धारदार हत्यारांनी हल्ला चढवला.
आरोपी किर्लोस्कर शिंदे याने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी अभय काळे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर जखमी केले. त्याच वेळी साजन शिंदे याने चाकूने फिर्यादीच्या डाव्या हातावर आणि दंडावर सपासप वार केले.
वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेला भाऊ होश झाकीर काळे (वय १९ वर्षे) याला अक्षर अतुल शिंदे याने जोरात ढकलून दिले आणि “तुला आज संपवतोच” असे म्हणून त्याच्या छातीवर चाकूने जोरदार वार केले. या गंभीर हल्ल्यात १९ वर्षीय होश काळे याचा जागीच मृत्यू झाला होता, तर अभिजीत काळे हा देखील गंभीर जखमी झाला होता.
टायर फुटला अन वनीकरणात कार सोडून आरोपी पळाले
या भीषण हत्याकांडानंतर चारही आरोपींनी त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी अल्टो कारमधून भांडेवाडी रस्त्याने पलायन केले. मात्र, घाईगडबडीत आणि अतिवेगामुळे त्यांच्या कारचे टायर अचानक फुटले. गाडी पुढे नेणे अशक्य झाल्याने आरोपींनी ती कार तिथेच वनीकरणाच्या क्षेत्रात सोडून दिली आणि जंगलाचा फायदा घेत पायदळ पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली मारुती कार तात्काळ जप्त केली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस (Satara News) अधीक्षक निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके आणि पुसेगावचे स.पो.नि. नागनाथ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली.आरोपींचा माग काढण्यासाठी वडूज पोलीस ठाणे हद्द, सिद्धेश्वर कुरोली परिसर, फलटण शहर व फलटण ग्रामीण भागातील जंगलात आधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली.
या दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे अमोल माने यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी किर्लोस्कर निरगेल शिंदे हा सिद्धेश्वर कुरोली परिसरात लपला आहे. त्यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा मागोवा घेत पुसेगाव पोलीस ठाण्याचे राहुल जाधव यांनी तिसरा आरोपी साजन किर्लोस्कर शिंदे यालाही सिद्धेश्वर कुरोली गावाच्या परिसरातून शिताफीने बेड्या ठोकल्या. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड आणि चाकू जप्त करण्यात आला आहे.
सदरची धडक कारवाई स.पो.नि. नागनाथ खुणे, पो.उ.नि. अजरुद्दीन शेख, पोलीस हवालदार योगेश बागल, विपुल भोसले, अमोल माने, पोलीस कॉन्स्टेबल दयाबा नरळे, अविनाश घाडगे, राहुल जाधव, उमेश देशमुख, शंकर सुतार, ज्ञानेश्वर जाधव आणि चालक तुषार बाबर यांनी केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी संपूर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.






