Satara News | सातारा गॅझेट अंमलबजावणी संदर्भात तयारी सुरू – मंत्री शिवेंद्रसिंहराजे

प्रभात वृत्तसेवा
सातारा – मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या हैदराबाद गॅझेटच्या संदर्भाचा जीआर सर्वसमावेशक पद्धतीने लागू होणार आहे. त्याच पद्धतीने सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीचा चिकित्सक अभ्यास करुन, ते येत्या एका महिन्यात लागू करण्याचा शब्द राज्य शासनाने मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. त्याबाबतची तयारी राज्य शासनाने सुरू केली आहे.
यासंदर्भात तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.दरम्यान, सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा सातार्यात मराठा समन्वयक समितीच्या माध्यमातून जंगी सत्कार करू. कारण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाला एकदा नाही दोनदा आरक्षण दिले आहे.
त्यांचे हे योगदान पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज कधीही विसरणार नाही, असे उद्गार शिवेंद्रसिंहराजे यांनी काढले.मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांचे सातार्यात शिवतीर्थावर मराठा समन्वयक समिती आणि सकल मराठा समाज यांच्यावतीने शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी घेतली. ते ब्राह्मण आहेत, म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, अशी भूमिका मांडली जात होती. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी फडणवीस यांची पहिल्या दिवसापासून ठाम भूमिका होती. 2019 साली असलेल्या परिस्थितीमध्येसुद्धा फडणवीस यांनी मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होते.
ते न्यायालयीन प्रक्रियेत टिकलेसुद्धा होते मात्र, महाविकास आघाडीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ते रद्द करावे लागले होते. हैदराबाद गॅझेटच्या आधारे जीआर काढण्यात येणार असल्याने, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून मिळणारे आरक्षण दुसर्यांदा मिळत आहे. याचे सारे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. राजघराण्याचा सदस्य म्हणून खासदार उदयनराजे भोसले व माझ्यावर काही जणांनी टीका केली होती. मात्र, टीका करणार्यांनी हे लक्षात ठेवावे की, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने मराठा समाजासाठी काय केले, हे तपासले का?
मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध आहे. मात्र, सातारा गॅझेटच्या आधारे आरक्षण मिळताना, ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान होणार नाही, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. सातारा गॅझेटच्या संदर्भाने निघणारा जीआर परिपूर्ण आणि कायद्याच्या पातळीवर टिकणारा असेल, याची खात्री करूनच, तो लागू केला जाईल, अशी ग्वाही शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली. इतर मागास प्रवर्ग आणि मराठा समाज यांच्यात कोणताही वाद होणार नाही. महाराष्ट्राला जातीय सलोख्याची मोठी परंपरा आहे. आपण सर्वांनी आजपर्यंत सामोपचाराने एकमेकांना सांभाळून घेतले आहे. मराठा आरक्षणाचा जीआर लागू झाल्यानंतरही हीच परंपरा कायम राहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाची मागणी गेल्या वीस-पंचवीस वर्षाची आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले; परंतु कोणीही हा विषय मार्गी लावला नाही. आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनांमध्ये गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे. मराठा आरक्षणाचा संपूर्ण जीआर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सातार्यात जाहीर सत्कार करण्यात येईल, अशी घोषणा शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. मनोज जरांगे यांचे शिवेंद्रसिंहराजे यांनी आभार मानले. आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देवो. जरांगे यांनी या जीआरसाठी अविरत संघर्ष केला, असेही ते म्हणाले.





