Satara News – नगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी गाळ्यांवर आणि समाजमंदिरांवर राजकीय अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चालल्याचे गंभीर चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. आजी- माजी नगरसेवकांच्या छत्रछायेखाली सुरु असलेल्या पोटभाडे व्यवस्थेमुळे पालिकेच्या तिजोरीत येणारा महसूल अक्षरशः आटत असून प्रशासन मात्र राजकीय दबावाच्या वरवंट्याखाली गुदमरल्याची चर्चा आहे. एका पालिका कर्मचाऱ्याला काळे फासण्याची धमकी देण्यात आल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या अतिक्रमण प्रकरणात माजी नगरसेवकाचे नाव पुढे आल्याने प्रभाग क्रमांक 23 मध्ये राजकीय संघर्ष पेटला. नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. तर दबावाखाली कर्मचाऱ्याने माफीनामा दिल्याची माहिती समोर आली. राजवाडा, जुना मोटार स्टँड, सदाशिव पेठ, चांदणी चौक, पंचपाळे हौद, चिमणपुरा, गोलबाग, कमानी हौद परिसरातील पालिकेच्या मालकीचे गाळे नगरसेवकांच्या ताब्यात असल्याची उघड चर्चा आहे. नाममात्र भाडे पालिकेकडे जमा होत असताना प्रत्यक्षात पोटभाडेकरूंकडून मोठ्या रकमा वसूल केल्या जात असल्याने ‘झारीतील शुक्राचार्य’प्रमाणे महसूल गिळंकृत होत आहे. व्यापारी गाळे (संग्रहित छायाचित्र) पालिकेशेजारील मंगल कार्यालयाचे उदाहरण अधिक धक्कादायक आहे. तब्बल साडेसहा लाखांची थकबाकी असतानाही संबंधित ठेकेदाराचा ताबा कायम आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे थकबाकी वसुलीचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे. दरम्यान, राधिका रोड ते सेनोर चौकदरम्यान वाढलेली टपरी अतिक्रमणे आणि त्यामागील राजकीय वरदहस्त हा वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहे. श्रमजीवींच्या नावाखाली भावनिक मुद्दे उभे करून काही लोकप्रतिनिधी स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याची टीका होत आहे. पालिकेतील अधिकारी वर्ग खासगीत बोलताना, ‘नियमांनुसार काम करायचे की दबावाखाली निर्णय घ्यायचे?’ या द्विधा मनःस्थितीत असल्याचे सांगतात. साताऱ्यातील नगरपालिका, पोलीस आणि महसूल विभागातही राजकीय हस्तक्षेपामुळे अधिकारी काम करण्यास कचरतात, अशी कबुलीही दिली जाते. मुख्याधिकारी विनोद जळक यांच्यासमोर या पार्श्वभूमीवर मोठी सत्वपरीक्षा उभी ठाकली आहे. नियमबाह्य गाळे, थकबाकीदार आणि पोटभाडे व्यवस्थेवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी यापूर्वी चुकीच्या कामांना कधीही थारा दिला नसल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याच साताऱ्यात पडद्यामागून सुरु असलेला राजकीय हस्तक्षेप प्रशासनाच्या गळचेपीचे कारण ठरत असल्याने आता यावर लगाम लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थावर विभाग कारवाई करणार का? सातारा नगरपालिकेच्या स्थावर विभागाची सूत्रे नुकतीच राज्य संवर्गातील अधिकारी सचिन शिंदे यांच्या हाती देण्यात आली आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून वरिष्ठ लिपिक शैलेश अष्टेकर कार्यरत आहेत. शहरातील सर्व गाळे व समाजमंदिरांची नोंद घेऊन थकबाकीदारांवर कारवाई करण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. थकबाकीदार गाळ्यांना कुलूप ठोकण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का, हा खरा प्रश्न आहे.