Satara News : चौकाचौकात पोलिसांची ‘डिजिटल नजर’ ; नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगरपालिकेचा मोठा निर्णय

प्रभात वृत्तसेवा
सातारा – नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विकासाच्या विविध योजना राबविल्या जात असताना आता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पालिका प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या कामाचा आराखडा तयार करून लवकरच या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.शहरातील मुख्य चौकात पालिका व पोलीस प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शिवाय बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक व खासगी आस्थापनांकडूनही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
असे असले तरी शहर व उपनगरात होणाऱ्या भुरट्या चोऱ्या, घरफोड्या, लुटमारीच्या घटना अधूनमधून घडत असतात. अशा घटनांवर अंकुश लावण्यासाठी व संपूर्ण शहराला सुरक्षा प्रदान करण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. मंजुरी मिळताच प्रत्यक्षात कामकाजाचा सुरुवात केली जाणार आहे.
पालिका करणार स्थान निश्चिती..
सातारा शहरातील पेठा, बाजारपेठ, शाळा- महाविद्यालय परिसर, शहराला जोडणारे प्रमुख रस्ते, चौक, उद्याने आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. परंतु, ते नेमके लावण्याबाबत पालिकेकडून प्रथम स्थान निश्चिती केली जाणार आहे.
वाईत लावले तसेच साताऱ्यातही हवे..
वाई शहरात पोलिस प्रशासनाकडून अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांबरोबरच येथे स्पीकर देखील लावण्यात आले आहेत. एखाद्या चौकात वाहतूक कोंडी झाली अथवा वाहनधारकांना काही सूचना द्यावयाच्या झाल्यास पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे दिल्या जातात. स्पीकरद्वारे या सूचना तातडीने संबंधितांपर्यंत पोहोचत असल्याने समस्यांच्या जागेवरच निराकरण होते. त्यामुळे पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावताना पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून ही यंत्रणा सक्रिय करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
संभाव्य ठिकाणे..
– पोवई नाका, समर्थ मंदिर चौक, मारवाडी चौक, करंजे नाका, गोडोली नाका, मोळाचा ओढा.
-१०० मीटर क्षेत्र संपादित करणारे उच्च झूम लेन्सचे कॅमेरे बसणार
-३२ कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीसह नवीन कॅमेऱ्यांची संरचना
-दळणवळण नियमनं व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने होणार नियोजनं





