Satara News | गणेशोत्सव-ईद पार्श्वभूमीवर साताऱ्यात पोलिसांचे पथसंचलन

प्रभात वृत्तसेवा
सातारा – जल्लोषात सुरू असलेला गणेशोत्सव आणि शुक्रवारी (दि. 5) असलेला ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) सण या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात सोमवारी पथसंचलन केले. पोलिसांच्या दंगाविरोधी पथकाने राजवाडा परिसरात प्रात्यक्षिके (मॉक ड्रिल) केली.पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या नेतृत्वाखाली शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मेत्रे, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांच्यासह 200 पोलीस अधिकारी व कर्मचार्यांनी पथसंचलन केले.
गणेशोत्सव आणि तीन दिवसांनी साजरा होणारा मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा पवित्र सण, या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांसह केंद्रीय राज्य राखीव दलाची पोलीस तुकडी शहरात तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास, खबरदारी घेण्यासाठी दंगाविरोधी पथकाने गांधी मैदानावर मॉक ड्रिल केले. ही प्रात्यक्षिके अचानक सुरू झाल्याने, परिसरातील नागरिक काही वेळ आश्चर्यचकित झाले होते. मात्र, हे मॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दंगाविरोधी पथकातील 30 जवानांनी प्रात्यक्षिके केली.त्याचबरोबर पोलिसांनी गोल बाग ते पोलीस कवायत मैदान यादरम्यान पथसंचलन केले. याविषयी बोलताना तुषार दोशी म्हणाले, सातारा पोलीस आणि सीआरपीएफच्या तुकडीला आपत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करता यावा, म्हणून ही प्रात्यक्षिके करण्यात आली. गणेश विसर्जन सोहळ्यात कोणतेही विघ्न येऊ नये, म्हणून सातारा पोलीस व सीआरपीएफची तुकडी तैनात राहणार आहे.
लखन भोसले या गुंडाचा सातारा पोलिसांनी पुण्याजवळ शिक्रापूरमध्ये एन्काऊंटर केला. त्याबद्दल दोशी म्हणाले, महिलांच्या दागिने लूटमार प्रकरणात तो प्रमुख आरोपी होता. सातारा पोलिसांच्या एक जवानाने स्वसंरक्षणार्थ लखनवर गोळ्या झाडल्या. जखमी पोलिसाची प्रकृती उत्तम आहे.





