Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यूचा PM रिपोर्ट आला पण…’या’ 3 प्रश्नांचं गूढ अद्याप कायम

Phaltan Doctor Death Case : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवा महिला डॉक्टरच्या (Phaltan Doctor Death Case) रहस्यमय मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. या प्रकरणी मुख्य संशयित म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली आहे. दोघांवर डॉक्टर महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
सध्या पोलीस कोठडीत असलेल्या या दोघांची कसून चौकशी सुरू असून, प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा म्हणून शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. या अहवालाने डॉक्टर महिलेचा मृत्यू गळफास घेतल्यामुळेच झाल्याची पुष्टी केली आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण, संशयितांशी असलेले संबंध आणि तळहातावर लिहिलेल्या संदेशाचे हस्ताक्षरहे तीन प्रमुख गूढ अद्याप उलगडलेले नाहीत. पोलीस या सर्व बाबींचा सखोल तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवालात नेमके काय आढळले?
फलटण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा अहवाल पोलीसांना प्राप्त झाला. अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, महिला डॉक्टरचा मृत्यू हा गळफास लावून आत्महत्या केल्यामुळेच झाला आहे. शरीराच्या मानेवर गळफासाच्या खुणा आढळल्या असून, त्याशिवाय शरीराच्या इतर कोणत्याही भागावर मारहाण, जखम किंवा बाह्य आघाताचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
या निष्कर्षामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये पसरलेल्या महिला डॉक्टरचा खून झाला आहे’ या दाव्यांना मोठा धक्का बसला आहे. डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला आत्महत्या नसून हत्येची शक्यता व्यक्त केली होती. त्यांनी संशयित पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. मात्र, वैद्यकीय पुराव्यांनी आत्महत्येची पुष्टी झाल्याने आता तपासाची दिशा आत्महत्येस प्रवृत्त करण्याकडे वळली आहे.
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट
शवविच्छेदन अहवालाने मृत्यूचे तांत्रिक कारण स्पष्ट केले असले तरी डॉक्टर महिलेला आत्महत्येसाठी का प्रवृत्त करण्यात आले? हा सर्वात मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. पोलीस तपासात आत्महत्येपूर्वी तिच्या मानसिक स्थितीबाबत कोणतेही ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत.
– तिने आत्महत्या का केली?
– तिच्या आयुष्यात कोणत्या समस्या होत्या?
– तिला धमकी देण्यात आली होती का?
– की तिच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला होता?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे पोलीसांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तिचा मोबाईल फोन, चॅट हिस्ट्री, कॉल रेकॉर्ड्स आणि सोशल मीडिया खाती तपासली जात आहेत, पण अद्याप कोणतेही निर्णायक पुरावे मिळालेले नाहीत.
तळहातावरील हस्ताक्षराचे रहस्य
प्रकरणातील सर्वात मोठे गूढ म्हणजे महिला डॉक्टरच्या तळहातावर लिहिलेला सात ओळींचा संदेश. या संदेशात बदने आणि बनकर यांची नावे नमूद होती.मात्र, हे हस्ताक्षर डॉक्टर महिलेचे नसल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. हस्ताक्षराची वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत, परंतु त्याचा अहवाल अद्याप पोलीसांना मिळालेला नाही. त्यामुळे हस्ताक्षराच्या सत्यतेचे गूढ कायम आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे हे पोलीस दलासमोरील मोठे आव्हान आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





