Satara News : एसटी स्थानकांवर प्रवाशांना मिळणार ‘या’ सुविधेचा मोफत लाभ; 1 जूनपासून अंमलबजावणी
Satara News : चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांचाही दर्जा सुधारणार; १५ एप्रिलपासून लागू झालेल्या स्वच्छता अधिभारानंतर महामंडळाचे मोठे पाऊल.

Satara News – एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये आणि मध्यवर्ती बसस्थानकांमधील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. प्रमुख बसस्थानके आणि आगारांमध्ये दर चार तासांनी स्वच्छता, पाणपोयांची देखभाल आणि चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमधील सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे.
महामंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त 1 जूनपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती विभाग नियत्रंक ज्योती गायकवाड यांनी दिली. एसटीच्या आगारांमध्ये आणि प्रमुख बसस्थानकांमध्ये स्वच्छतेचा दर्जा दिवसेंदिवस घसरत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने, प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे अस्वच्छेत भर पडत आहे.
एसटीची बसस्थानके आणि आगारांमधील स्वच्छतागृहे, चालक-वाहकांची विश्रांतीगृहे, पाणपोई यांचा दर्जा सुधारण्यासाठी तिकीटावर 2 रुपये स्वच्छता अधिभार 15 एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे. एसटी महामंडळ व विविध संस्थांकडून या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाते. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी प्रवाशांना पाच ते दहा रुपये आकारले जातात. पैसे घेऊनही स्वच्छतेबाबत प्रवाशांच्या तक्रारी कायम आहेत.
त्यामुळे एसटीच्या ताब्यात असलेल्या स्वच्छतागृहांचा वापर मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये लागू होणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी बसस्थानकांमध्ये कचर्याचे नवे डबे ठेवण्यात येणार असून, स्थानकांची दर चार तासांनी स्वच्छता होणार आहे.





