प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेच्या वतीने शहराच्या सर्व प्रवेशद्वाराजवळ पाच अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. यापैकी वाकड भागात उभारण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहाच्या कामाला सुरुवात झाली असून, उर्वरित चार स्वच्छतागृहांच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर त्यांचे काम सुरू केले जाणार आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ही स्वच्छतागृहे उभारली जाणार असून, यासाठी सुमारे चार कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. पुणे शहरात दररोज बाहेरगावावरून कामानिमित्त येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अनेक जण दहा ते बारा तासांचा प्रवास करुन शहरात येतात. शहरात आल्यानंतर त्यांना सोयीसुविधा असलेली स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी महापालिकेने पाच ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला होता. मॉल, मल्टीप्लेक्सप्रमाणे नागरिकांना चांगले आणि स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावीत, यासाठी वातानुकूलित (एसी) स्वच्छतागृहे ही असणार आहेत. याची देखभाल करण्यासाठी खासगी ठेकेदाराकडे जबाबदारी दिली जाणार आहे. यासाठी शुल्क देखील घेण्यात येणार आहे. शहराचा विस्तार चारही दिशांना होत असून, लोकसंख्येतही वाढ होत आहे. नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेची विविध भागात सुमारे १२०० स्वच्छतागृहे आहेत. मात्र यामध्ये विद्युत व्यवस्था नसणे, पाण्याची सोय नाही, तुटलेल्या फरशा, फुटलेली पाइपलाइन यामुळे अनेक स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे त्यांचा वापर करण्यास नागरिकांकडून टाळाटाळ केली जाते. अशावेळी महिलांची कुचंबणा होते, पर्यायाने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काही दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. बाणेर (जकात नाका), स्वारगेट एस.टी स्थानकाच्या शेजारी, शेवाळवाडी, कात्रज तसेच वाघोली येथे ही स्वच्छतागृहे उभारली जाणार आहेत. यापैकी बाणेर येथे स्वच्छतागृहाचे काम महापालिकेने सुरु केले आहे. उर्वरित चार ठिकाणच्या जागांचे प्रस्ताव आणि ठराव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवले जात आहे. त्यांना मान्यता मिळाल्यानंतर त्यांची कामे तातडीने सुरु केली जातील. प्रत्येक स्वच्छतागृहासाठी ८७ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.अशी माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. अशा असतील सुविधा.. व्हीआयपी स्वच्छतागृहात अंघोळीची, कपडे बदलण्याची सुविधा असणार आहे. मोबाइल, लॅपटॉप चार्जिंगची सुविधा आणि वायफाय देखील राहणार आहे. ही स्वच्छतागृह पूर्णपणे वातानुकूलित असून, मॉल, मल्टिप्लेक्सच्या धर्तीवर असतील. हे सशुल्क असणार आहेत. शुल्काबाबतचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे.