Satara News: …तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल! सातारा मनसेचा अन्न अन् औषध प्रशासनाला अल्टिमेटम
Satara News: सिव्हिल रुग्णालयातील कॅन्टीनसह शहरातील हॉटेल्सची तपासणी करा; सातारकरांच्या ताटातील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी मनसेचे प्रशासनाला निवेदन.

Satara News- सातारकरांच्या ताटात नेमके काय वाढले जात आहे, याचा खुलासा करण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासनाने शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तपासणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. खाद्यतेलाचा वारंवार वापर, निकृष्ट अन्नपदार्थ, मुदतबाह्य फ्रोजन पदार्थ तसेच स्वच्छतेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्याचा दावा करत मनसेने प्रशासनाला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी याबाबत मुख्यमंत्री, एफडीए आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अन्नसुरक्षा अधिकार्यांना निवेदन दिले आहे. डोमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड्ससह हॉटेल द फन, हेगडे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, राजपुरोहित मिठाई निर्मिती केंद्रे, वाढे फाटा परिसरातील पेढे विक्रेते, राजमाने व डी. के. तेल डेपो, सिव्हिल रुग्णालयातील कॅन्टीन, खानावळी तसेच शहरातील बेकर्या आणि केक निर्मिती केंद्रांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नुसती कागदी कारवाई नको…
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत संशय असल्यास केवळ तक्रारींची नोंद न करता संबंधित आस्थापनांमधून अधिकृत नमुने घेऊन मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. खाद्यतेलाचा पुनर्वापर, साठवणूक, तापमान नियंत्रण आणि मुदतबाह्य पदार्थांच्या वापराबाबतही विशेष तपासणी करण्याची मागणी आहे.
राहुल पवार म्हणाले…
सातारकरांच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे. एफडीएने सात दिवसांत प्रत्यक्ष तपासणी करून नमुने घ्यावेत आणि कारवाईचा लेखी अहवाल द्यावा. अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यातून निर्माण होणार्या कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा राहुल पवार यांनी दिला.




