Satara News : युनोच्या सभागृहात घुमला मराठी बाणा, अॅड. वर्षा देशपांडे यांचा गाैरव

सातारा : लिंगभेदाच्या आधारे होणार्या गर्भलिंग निवडी विरोधातील संघर्षाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. संयुक्त राष्ट्रसंघाने दलित महिला विकास मंडळाच्या सचिव अॅड. वर्षा देशपांडे यांना युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्डने सन्मानित केले. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर अॅड. देशपांडे यांनी उपस्थितांना मराठी भाषेत संबोधित केले. युनाच्या सभागृहात पहिल्यादांच मराठी बाणा घुमला.
न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या वतीने दिला जाणारा सन्मानाचा पुरस्कार यूपर्वी डॉ. जे. आर. डी. टाटा आणि पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांना देण्यात आला आहे. त्यांच्यानंतर वैयक्तिक श्रेणीत दलित महिला विकास मंडळाच्या माध्यमातून हा पुरस्कार मिळविणार्या त्या तिसर्या भारतीय ठरल्या आहेत. त्यामुळे पुरस्कार स्विकारल्यानंतर आपले मनोगत त्यांनी मराठीत व्यक्त केले.
त्या म्हणाल्या, हा पुरस्कार जनसामान्यांच्या सोबत राहून एका सामान्य महिलेने छोट्या संस्था संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीने केलेल्या स्त्री पुरुष समतेच्या संदर्भातील कामाला दिला जाणार आहे. आणि म्हणून हा सन्मान संपूर्ण जगभरातील भारतातील महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांसाठी लोकांच्या सोबत राहून लोकांचे प्रश्न मांडणार्या त्याच्यासाठी संघर्ष करणार्या सर्व संस्था संघटनांमध्ये काम करणार्या कार्यकर्त्यांचा हा सन्मान आहे.
त्यांच्या कमिटमेंटच्या आणि कष्टाचा, सामाजिक कामाचा सन्मान आहे. म्हणून त्यांच्या सर्वांच्या वतीने हा पुरस्कार नम्रतापूर्वक स्वीकारणार आहे. या पुरस्काराने केलेल्या कामाचा सन्मान तर होतच आहे पण त्याहीपेक्षा हा पुरस्कार स्वीकारताना जबाबदारीची जाणीव अधिक आहे. भविष्यकाळातील जनसामान्यांच्या प्रश्नांवरती काम करणार्या सर्व कार्यकर्त्यांना हा पुरस्कार ऊर्जा देईल लढण्याचे बळ देईल याची मला खात्री आहे.
बीड जिल्ह्यातील कामाची दखल
गर्भलिंग निदान आणि मुलींची कमी होणारी संख्या आम्ही केलेलं काम हे स्त्री पुरुष समतेच्या दिशेने पडलेलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं ऐतिहासिक पाऊल जरी असलं तरी बीड जिल्ह्यात आम्ही यु एन एफ पी ए यांच्या सहकार्यातून बालविवाह थांबवण्याचे काम केलं. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. 2500 हुन अधिक मुलीना नर्सिंग, ड्रायव्हिंग, फोटो शॉपी, केटरिंग अशा प्रकारच्या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणामुळे 500 हून अधिक मुली प्रशिक्षित झाल्या
तसेच शंभरहून अधिक मुली बालविवाहाच्या कचाट्यातून वाचल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहिल्या. हे सगळं केवळ युनायटेड नेशन्स पोपुलेशन फंड त्यांच्या महाराष्ट्र ऑफिसचा पुढाकार, अनुजा गुलाटी आणि भारतातला यु.एन.एफ.पी चे ऑफिस आणि त्यामध्ये कार्यरत असणारे सर्व अधिकारी यांच्या प्रती ऋण व्यक्त करायचे आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारा सन्मान निश्चितच आनंददायी आहे. मातृभाषा बोलायल सहज, सोपी आणि आपल्या जवळची वाटते. त्यामुळे पुरस्कार घेतल्यानंतर व्यक्त होताना मातृभाषेत व्यक्त व्हावं हे ठरवले होते. पुरस्कार स्विकारताना राष्ट्रगीताची वाजणारी धुन खूपच भावनिक होती.
– अॅड. वर्षा देशपांडे, लेक लाडकी अभियान





