Satara News : कोयना धरणाचे दरवाजे उघडले; 5,500 क्युसेक विसर्ग सुरू

कोयनानगर : गेल्या २४ तासांत कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर मुसळधार पावसाची नोंद झाली असून, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. वाढत्या जलस्तरामुळे धरण प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू केला आहे. कोयनानगर येथे 103 मिलीमीटर, नवजा येथे 134 मिलिमीटर, तर महाबळेश्वर येथे 92 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद २४ तासांत झाली आहे. यामुळे कोयना धरणात 15,719 क्युसेक पाण्याची आवक होत असून, धरणातील पाणीसाठा 75.48 टीएमसी वर पोहोचला आहे.
ही पातळी गेट लेव्हलच्या जवळ गेल्याने आणि परिचालन यंत्रणेच्या नियमानुसार धरणाचे सहा वक्र दरवाजे प्रत्येकी 1 फूट 6 इंच उचलण्यात आले आहेत. यामधून 3,400 क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यासोबतच पायथा वीजगृहाच्या माध्यमातून 2,100 क्यूसेक्स पाणी विसर्ग केला जात आहे. एकूण मिळून 5,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे. धरण प्रशासनाकडून कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी सांगितले की, “धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, विसर्ग प्रक्रिया पूर्णतः नियमानुसार आणि नियंत्रणाखाली आहे. प्रशासनाच्या सूचना वेळोवेळी नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. नागरिकांनी कोणतीही घाबरगुंडी न करता शांतता राखावी आणि प्रशासनाशी सहकार्य करावे.” धरण व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवसांमध्येही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण परिसरात तसेच नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने संभाव्य धोका लक्षात घेऊन सर्व यंत्रणा सतर्क ठेवली आहे.





