प्रभात वृत्तसेवा सातारा – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाने संयुक्तपणे विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे अचूकपणे लेखन कसे करावे, या विषयावर मार्गदर्शन करणारे व्हिडिओ तयार करण्यासाठी मंडळाने शिक्षकांसाठी अभिनव व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली आहे. ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग, सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ या कृतीकार्यक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेचे संयुक्त परिपत्रक कोकण बोर्डाच्या सचिव पुनित गुरव आणि कोल्हापूर बोर्डाचे सचिव सुभाष चौगुले यांनी गुरुवारी निर्गमित केले आहे. कोल्हापूर मंडळाने गेल्या वर्षी तयार केलेले व्हिडिओ राज्य मंडळाने स्वीकारल्यानंतर आता पाच जिल्ह्यांतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या यशात योगदान देण्याची संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन देणे, अभ्यासाची आवड निर्माण करणे आणि लेखनकौशल्य विकसित करुन परीक्षेलाआत्मविश्वासाने सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक किंवा त्यांचे विषय शिक्षक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा त्यांचे विषय शिक्षक यांच्यासाठी खुली आहे. शिक्षकांनी स्वतः व्हिडिओ निर्मिती करणे आवश्यक आहे, तांत्रिक बाबींसाठी ते सहाय्यकाची मदत घेऊ शकतात. विशेषतः, नोंदणी अर्जामध्ये संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची किंवा मुख्याध्यापकांची शिफारस असणे आवश्यक आहे. मार्गदर्शक व्हिडिओ तयार करण्यासाठी दहावीसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, भूमिती, विज्ञान भाग १, विज्ञान भाग-२, इतिहास आणि भूगोल या सर्व विषयांचा समावेश आहे. बारावीसाठी कला शाखेसाठी इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र.वाणिज्यसाठी पुस्तकपालन व लेखाकर्म, वाणिज्य संघटन, चिटणासाची कार्यपध्दती, सहकार. शास्त्र शाखेसाठी गणित व संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. याशिवाय, सर्व शाखांसाठी महत्त्वाचे असणारे भाषिक विषय मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयांवरही व्हिडिओ तयार करता येतील. असा असावा व्हिडिओ… व्हिडिओची लांबी ७ ते १० मिनिटे असावी, विषयाचा आशय, विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन, विषयाची भीती कमी करणे, उत्तरपत्रिका सोडवताना घ्यावयाची काळजी, प्रश्ननिहाय भारांश, उत्तरलेखन पध्दती, गुणांकन निकष आणि वेळेचे नियोजन या बाबींचा व्हिडिओत समावेश असावा. व्हिडिओचा फॉरमॅट एमपी 4 असावा. सुरुवातीला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तपशील असावा. व्हिडिओ दि. २६ डिसेंबरपर्यंत स्वतःच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. एका स्पर्धकाला फक्त एकाच व्हिडिओची लिंक कॉपी करुन नोंदणी फॉर्ममध्ये पेस्ट करायची आहे. प्राचार्यांची शिफारस आवश्यक असलेला हा नोंदणी अर्ज अपलोड केलेल्या व्हिडिओच्या लिंकसह दि. २६ डिसेंबर पर्यंत divkopvideo25@gmail.com या ईमेलवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘अशी अभिनव स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात येत आहे. परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका लेखनास यातून मार्गदर्शन होणार आहे,” – राजेश क्षीरसागर (विभागीय अध्यक्ष, कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ)