Satara News | जिल्ह्यातील बारा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार

प्रभात वृत्तसेवा
सातारा – शिक्षण क्षेत्रात योगदान देणार्या शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात. यंदा प्रत्येक तालुक्यातून एक, असे 11 आणि जिल्ह्यात विशेष गटातून एक, अशा एकूण 12 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या पुढाकाराने यावर्षी पुरस्काराची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली.
या पुरस्कारांचे वितरण लवकरच भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शिक्षक पुरस्कारांसाठी पोर्टल तयार करून, ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागवण्याचा निर्णय गतवर्षी घेतला होता. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या पात्र शिक्षकांची निवड करण्यासाठी संकेतस्थळावर अर्ज मागवण्यात आले होते.
यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे समितीमार्फत मूल्यांकन करून, 12 शिक्षकांची अंतिम निवड करण्यात आली आहे. प्रस्तावांच्या छाननीत त्रुटी राहू नयेत, याची प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली होती. पुरस्कार निवडीची प्रक्रिया पारदर्शक राहील, याकडे नागराजन यांचे लक्ष होते. त्यामुळे या प्रक्रियेत कोणाचाही हस्तक्षेप झाला नाही.
आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी ‘सातारा प्राइड’..
आदर्श शिक्षक पुरस्कार प्रस्ताव मागणी, छाननी, सादरीकरण व निवडीसाठी ‘सातारा प्राइड पोर्टल फॉर रेकग्नायझिंग इनस्पायरिंग डिस्ट्रिक्ट एज्युकेटर्स’ हे पोर्टल तयार करण्यात आले होते. ‘सन्मान शिक्षकांचा स्वाभिमान सातार्याचा’ या घोषवाक्यास अनुसरुन या पोर्टलवरच 2025-26 च्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.





