प्रभात वृत्तसेवा सातारा – जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींच्या कामांची अंतिम यादी सोमवार, दि. 20 पर्यंत घ्यावी. यादी मिळवण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकार्यांनी संपर्क साधावा. दि 20 पर्यंत आलेल्या कामांनाच तात्काळ मान्यता द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.जिल्हा वार्षिक योजना 2025-26 चा आढावा पालकमंत्री देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात व विभाग प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले, लोकप्रतिनिधींकडील कामांची अंतिम यादी मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनीही प्रयत्न करावेत. स्मार्ट अंगणवाडी उपक्रम जिल्ह्यात राबवावा. बोलक्या भिंती, लहान मुलांसाठी बेंचेस, स्वच्छतागृहे यासाठी जिल्हा परिषदेला निधी उपलब्ध करुन दिला जाईल. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुका होणार असल्याने, जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे विविध विभागांनी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता तातडीने घेऊन, कामे नियोजनबद्धरित्या पूर्ण करावीत. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी परत जाणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी. कराड पालिकेच्या शाळेचे काम वेळेत करावे.. समग्र शिक्षण अभियानांतर्गत कराड पालिकेच्या शाळा क्र. 3 ला दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा आहे. या शाळेचे काम वेळेत व उच्च दर्जाचे करावे. या कामात लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. ‘माझी शाळा आदर्श शाळा’साठी ज्याप्रमाणे उच्च दर्जाचे साहित्य वापरले आहे, तसेच उच्च दर्जाचे साहित्य या शाळेच्या कामासाठी वापरावे, असे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले.