Satara News : कोयनानगरात श्री संत बाळूमामा देवालयाचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा
Updated On:

कोयनानगर : कोयनानगर येथे श्री संत बाळूमामा देवालयाच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा अनुपम संगम अनुभवायला मिळाला. परिसरातील शेकडो भक्तांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त हजेरी लावली.
सकाळी अभिषेक, आरती आणि महापूजेनं कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर संध्याकाळी भक्तिमय कीर्तन, भजन आणि महाप्रसादाने वातावरण आध्यात्मिक रंगात न्हाले. भागोजी बावधाने यांच्या मंत्रोच्चारांनी परिसर भक्तिमय झाला.
‘सेवा हीच खरी भक्ती’ या बाळूमामांच्या तत्त्वानुसार हे देवालय धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवत आहे. ग्रामस्थ, महिला मंडळ, युवक मंडळ आणि मंदिर समितीच्या एकजुटीमुळे हा सोहळा यशस्वी झाला. “हा फक्त देवालयाचा उत्सव नसून गावाच्या श्रद्धेचा महोत्सव आहे,” अशी भावना भक्तांनी व्यक्त केली.





