Satara News – जिल्ह्यात अंमली पदार्थांचे उत्पादन आणि पुरवठा पुरवठा होऊ नये यासाठी पोलीस दलाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. नार्को कोऑर्डीनेशन सेंटर समितीची बैठक संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी आशिष बारकुल, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहाय्यक आयुक्त वर्षा गाडेकर आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, अंमली पदार्थांच्या विरोधात पोलीस दलाने वर्षभरात केलेल्या कारवाईचा अहवाल पुढील बैठकीत सादार करावा. महाबळेश्वर व पाचगणी येथे मोठ्या संख्येने पर्यटक येतात. त्यामुळे येथील हॉटेल, रेसॉर्टची वेळोवेळी तपासणी करावी. जिल्ह्यात रेव्ह पार्ट्या होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात शासनाचे एकही व्यसनमुक्ती केंद्र नाही. या केंद्राच्या उभारणीचा प्रस्ताव समाज कल्याण विभागामार्फत देण्यात येईल. दरम्यान, वर्षभरात अंमली पदार्थांविरोधात केलेल्या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक दोशी यांनी दिली.