Satara News | गणेशोत्सवात डॉल्बीची मर्यादा ओलांडू नका ; पालकमंत्र्यांचा सज्जन इशारा!

प्रभात वृत्तसेवा
सातारा – ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मर्यादेचे डॉल्बी चालकांनी गणेशोत्सव कालावधीत तंतोतंत पालन करावे. ध्वनी मर्यादेचे पालन करणार नाहीत अशा डॉल्बी चालकांवर कारवाई करावी आणि लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालावी, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गणेशात्सवाच्या तयारीचा आढावा पालकमंत्री देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार, नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यात लेझर लाईटला पूर्णपणे बंदी घालावी, असे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘‘लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही सार्वजनिक गणेश मंडळाने लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी.
गौरी विसर्जनानंतर महिला मोठ्या प्रमाणात गणपती पाहण्यासाठी बाहेर पडतात. छेडछाड किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे. विसर्जन मिरवणुकीवेळी कोणत्याही प्रकारचा तंटा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. गणेशोत्सव काळात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.’’ प्रशासनाने गणेशोत्सवाचे चांगले नियोजन केले असून यंदाचा गणेशोत्सव सुखात, आनंदात व उत्साहात पार पाडूया, असेही आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले.





