Satara News : पारायण सोहळ्यामुळे दौलतनगर बनले प्रती पंढरपूर

कोयनानगर : महाराष्ट्राचे पोलादी नेतृत्व लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त दौलतनगर येथे आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदा खास भाविकांच्या उपस्थितीत भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात पार पडला. यादिवशी दौलतनगर गावाचे रूपांतर प्रती पंढरपुरात झाले होते.
श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमांची टाळ- मृदंगाच्या निनादात आणि विठ्ठलनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात भक्तांची पावलं टाळांच्या तालावर थिरकत होती. साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, २१ तोफांची सलामी आणि पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली. पुतळ्याजवळ रंगलेला रिंगण सोहळा हे या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले.
या सोहळ्यात ७८३ वाचकांनी ज्ञानेश्वरी पारायणात सहभाग घेतला. सोहळ्यात कीर्तन, प्रवचन, अभंग व भजनांच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. कार्यक्रमात पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, श्रीमती विजयादेवी देसाई, यशराज देसाई, रविराज देसाई, डॉ. वैष्णवीराजे देसाई, जयराज व आदित्यराज देसाई आदी मान्यवरांची उपस्थिती होती. चौथ्या दिवशी काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वाटप करून या अखंड हरीनाम सोहळ्याची सांगता करण्यात आली.
ह. भ. प. पुंडलिक महाराज कापसे (आळंदीकर) यांनी व्यासपीठ चालक म्हणून परंपरेप्रमाणे यंदाही सेवा बजावली. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी ह. भ. प. जयवंतराव शेलार महाराज, अनिल पाटील महाराज, जगन्नाथ ठोंबरे महाराज तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समूहाचे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ह. भ. प. जयवंतराव शेलार महाराज हे गेले तीन महिने आजारी असतानाही त्यांनी आपल्या आजाराकडे दुर्लक्ष करून या पारायण सोहळ्याचे संपूर्ण नियोजन आत्मियतेने केले. हरिनामातून समाजात भक्तिभाव जागवण्याचे कार्य त्यांनी अहोरात्र केले. त्यांच्या या सेवाभावाने सर्व भाविक भक्त भारावून गेले.





