Satara News : भूस्खलन बाधितांचे पुनर्वसन डिसेंबरपूर्वी पूर्ण करा; पालकमंत्र्यांची प्रशासनाला ताकीद

कोयनानगर : कोयना विभागातील मिरगाव येथे जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलनाची मोठी दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत बाधित झालेल्या कुटुंबांना डिसेंबरअखेर पक्की घरे ताब्यात मिळालीच पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. दौलतनगर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी मिरगाव पुनर्वसन प्रकल्पातील कामांचा तपशीलवार आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, तहसीलदार अनंत गुरव, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या भूस्खलनात १४७ कुटुंबांचे नुकसान झाले असून त्यातील ४७ कुटुंबे संपूर्णतः बाधित आहेत. सध्या ९८ कुटुंबांना तात्पुरत्या निवारा शेडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “ही कामे वेळेत पूर्ण झालीच पाहिजेत. डिसेंबरअखेर किमान १०० घरे पूर्ण करून संबंधितांना ताब्यात द्या. उर्वरित घरे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत. कोणताही अडथळा खपवून घेतला जाणार नाही. अडथळे करणाऱ्यांवर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली जाईल.” बैठकीला महसूल आणि ग्रामविकास विभागाचे अधिकारी, तसेच बाधित कुटुंबांचे प्रमुखही उपस्थित होते.





