Satara News : पालिकेच्या प्रभाग क्रमांक २३ मधील केसकर कॉलनी परिसरात सुरु असलेल्या संरक्षण भिंत आणि बंदिस्त गटाराच्या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राहुल जाधव (दरेखुर्द) यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रार अर्जात संबंधित कामांमध्ये बांधकाम नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा दावा केला आहे. गटार परिसरातील कामात योग्य दर्जाचे साहित्य न वापरता सिमेंट मिसळून निकृष्ट पद्धतीने बांधकाम केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे या कामांचे बिल अदा करू नये, अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच जानकर वस्ती मार्गालगत पोळ वस्ती येथील ओढ्यावर सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे कामही दर्जाहीन असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याचे देयक रोखावे, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे. दरम्यान, केसकर कॉलनी येथे नवीन अंगणवाडीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यासाठी जुनी अंगणवाडी पाडण्यात आली आहे. मात्र, या भागात अंगणवाडीऐवजी लोकसहभागातून मोठा सांस्कृतिक हॉल अथवा समाजमंदिर उभारण्यात यावे, असा पर्यायी प्रस्तावही राहुल जाधव यांनी आपल्या तक्रार अर्जातून मांडला आहे. Pune District : पाणीटंचाईवर समर्थ फाउंडेशनचा दिलासा; मोफत टँकर सेवेचा ग्रामस्थांना आधार