राजगुरुनगर : खेड तालुक्याच्या पूर्व भागात यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे गटनेते अॅड. विजयसिंह शिंदे यांनी ‘समर्थ फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू केलेल्या मोफत पाणी टँकर सेवेमुळे शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे कोणतीही निवडणूक नसताना, केवळ सामाजिक बांधिलकी आणि जनसेवेच्या भावनेतून हा उपक्रम गेल्या महिनाभरापासून अविरत सुरू ठेवण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्चपासून खेड तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली होती. वाढते तापमान, आटलेल्या विहिरी, कोरड्या पडलेल्या कूपनलिका आणि अपुर्या जलस्रोतांमुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत होती. विशेषतः माता-भगिनींना पहाटेपासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन अॅड. विजयसिंह शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत ‘समर्थ फाउंडेशन’च्या माध्यमातून मोफत पाणी टँकर सेवा सुरू केली. गेल्या महिनाभरापासून हे टँकर दररोज विविध गावांमध्ये आणि वाड्या-वस्त्यांमध्ये फेर्या मारत असून नागरिकांच्या घरापर्यंत पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे. खेडच्या पूर्व भागामध्ये प्रामुख्याने कनेरसर, पूर, गोसावी, वरुडे, चौधरवाडी, चिजबाईवाडी, गडकवाडी, वाफगाव, जवळके बुद्रुक, निमगाव ठाकरवाडी, दावडी ठाकरवाडी, वाकलवाडी, वाकडवाडी ठाकरवाडी, गुळाणी यासह विविध ठाकरवाड्यांमध्ये नियमितपणे पाणी वाटप केले जात आहे. या सेवेमुळे अनेक गावांतील नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, स्थानिक ग्रामस्थांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे. जनतेची सेवा हाच आमचा धर्म आहे. निवडणुका येतात-जातात, पण जनतेशी असलेले नाते कायम असते. पूर्व भागातील महिलांची आणि नागरिकांची पाण्यासाठी होणारी फरफट पाहून आम्ही हा निर्णय घेतला. जोपर्यंत पावसाळा सुरू होत नाही आणि पाणी प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत समर्थ फाउंडेशनच्या वतीने ही मोफत टँकर सेवा सुरूच राहणार आहे. – अॅड. विजयसिंह शिंदे, गटनेते, पुणे जिल्हा परिषद हेही वाचा : Pune District : इंद्रायणी स्वच्छतेसाठी आळंदीत जनसागर