Satara News : धावत्या एसटी बसने घेतला पेट; हासेवाडी येथील घटना

कोरेगाव : वाठार स्टेशन येथून प्रवासी घेऊन जात असताना धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना हासेवाडी ता कोरेगाव येथे घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या कोरेगाव डेपोची गाडी क्रमांक एमएच 11 बी एल 9337ही एसटी बस आज दिनांक 15 रोजी दुपारी 12.30 वाजता वाठार स्टेशनहुन भाडळे मार्गे कोरेगाव या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसह २३ प्रवासी घेऊन निघाली होती.
दरम्यान दुपारी 1.15 वाजता हासेवाडी ता कोरेगाव या गावात गाडीने प्रवेश केल्यानंतर गाडीच्या इंजिन जवळून आगीच्या ज्वाला येत असल्याच्या पुढे बसलेल्या महिला प्रवाशाच्या लक्षात आले. यावेळी या प्रवाशांमध्ये 7 शालेय विद्यार्थी व 4 इतर प्रवासी मिळून गाडीमध्ये 11 प्रवासी होते.
या सर्वांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गाडीतील सर्व प्रवासी जलद गतीने गाडीतून खाली उतरले. त्यानंतर गाडीने मोठा पेट घेतला. यावेळी गावातील लोकांनी पाण्याच्या साह्याने पेटलेली एसटी बस विझवली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी न होता एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.





