Koynanagar Bus Stand – कोयनानगर येथील बसस्थानकाचा कायापालट पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकारातून साकार झाला असून, सुमारे ७० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या नूतनीकरणामुळे स्थानकाला नवे आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. या कामामुळे कोयनानगरच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गत महिनाभर या नूतनीकरणाच्या कामासाठी बसस्थानक वाहतुकीस बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी ठिकाणांवरून प्रवास करावा लागत होता. मात्र, १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने हे स्थानक पुन्हा प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या नूतनीकरणामध्ये बसस्थानक परिसराचे संपूर्ण कॉंक्रिटीकरण करण्यात आले असून, पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे, चिखल आणि पाणी साचण्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. बसची ये-जा अधिक सुरक्षित व सुरळीत झाली असून, प्रवाशांसाठी प्रशस्त जागा, वाहन उभे करण्याची व्यवस्था आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. बसस्थानक परिसरात आकर्षक प्रकाशयोजना उभारण्यात आली असून, रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर उजळून निघतो. ग्रामीण भागात असूनही शहरी दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे हे स्थानक आता कोयनानगरच्या बदलत्या विकासाचे प्रतीक ठरत आहे. या कामाची अंमलबजावणी कोयना प्रकल्पाच्या यंत्रणेमार्फत करण्यात आली. प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता महेश रासनकर, उपअभियंता किरण कानुगडे तसेच शाखा अभियंता चेतन ढेरे यांनी कामाची जबाबदारी सांभाळली. ठेकेदार अरविंद देवकर यांनी उत्कृष्ट दर्जा राखत काम पूर्ण केले आहे. कामाची पाहणी करताना अधीक्षक अभियंता अभय काटकर व कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी दर्जेदार कामाबाबत समाधान व्यक्त केले.