सातारा – नवमतदारांनी नावनोंदणी करावी

सातारा – जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मतदार नावनोंदणी, नाव कमी करणे, मतदार यादीतील दुरुस्ती करण्यात येणार आहे. नवमतदारांनी नावनोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, “”प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नावनोंदणी, नाव कमी करणे, मतदारयादीतील दुरुस्तींची कामे करण्यासाठी 9 डिसेंबरपर्यंत मोहिम राबवण्यात येणार आहे. प्रारूप यादी बीएलओ यांच्याकडे असून मतदारांनी माहिती तपासून घ्यावी. त्यासाठी फॉर्म 6 भरून दुरुस्ती करावी. जिल्ह्यात 25 लाख मतदार असून त्यामध्ये 13 लाख 50 हजार पुरूष व 12 लाख 50 हजार स्त्री मतदार आहेत. लोकसंख्येच्या 71 टक्के मतदार आहेत. 18 ते 19 वयोगटातील मतदार 1 लाख 16 हजार मतदार असणे आवश्यक होते पण ते 26 हजार आहेत. नवमतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे कॅंप घेण्यात येणार आहे.
युवक- युवतींना यावर्षातील 1 जानेवारी, 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर या दिवशी 17 वर्षे पूर्ण होत असतील तर ते पुढील वर्षीसाठी आत्ताच नोंदणी करू शकतात.” प्रत्येक गावात 1 ते 7 डिसेंबर यादरम्यान ग्रामसभा घेण्यात येणार आहे. गावातून स्थलांतर होत असते. पत्ते बदलतात. हे बदल मतदारांना करता येतील. एससी, व्हीजेएनटी, वारांगणा, तृतीयपंथी, दिव्यांग मतदारांची नोंदणी होत नाही. या घटकांतील प्रत्येकाची नोंदणी व्हावी यासाठी विशेष ड्राईव्ह घेण्यात येणार आहे. त्यासाठी सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाईल.
काही कागदपत्रे नसतील तर स्वघोषणा केल्यास मतदान केंद्र मिळेल. फॉर्म 6 भरल्यानंतर मतदान ओळखपत्र मिळते. पत्त्यावर मतदान ओळखपत्र न आल्यास 1950 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात 3 हजार 19 मतदान केंद्रे आहेत.
त्यापेक्षा जादा मतदार संख्येमुळे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. या कामासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मदत घेतली जाईल. दुर्गम भागातील मतदान केंद्रांना इंटरनेट सेवा तसेच मोबाइल सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठीचे सर्व्हे करण्यात आले आहेत. लवकरच ही सेवा सुरू होई, असेत्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे आदी उपस्थित होते.





