सातारा – वृक्षारोपणासह संवर्धन करण्याची गरज

सातारा – जागतिक तापमान वाढ, पर्यावरणाचा र्हास या समस्यांचा सामना आज करावा लागत आहे. या समस्यांमुळे निसर्गाचे ऋतुचक्र बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, अतिउष्णता यासारखे गंभीर परिणाम जाणवत आहेत. हे चित्र बदलायचे असेल तर, पर्यावरण आणि निसर्गाचे रक्षण झाले पाहिजे. त्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केले.
विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छत्रपती शाहू अॅकॅडमीच्यावतीने गोळीबार मैदान, गोडोली, विलासपूर आदी परिसरात कडुनिंब, चिंच, जांभूळ आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी त्या बोलत होत्या. अॅकॅडमीच्या प्राचार्या सौ. डिंपल जाधव, फिरोज पठाण, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनीच या वर्षीचा कडक उन्हाळा अनुभवला आहे. भविष्यात असा त्रास होऊ नये, या उद्देशाने शाळेच्यावतीने शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्या परिसरातील नागरिकांनी घ्यायला हवी, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.
दरम्यान, लागवड केलेल्या रोपांचे संगोपन शाळेचे विद्यार्थी करणार आहेत. झाडांना पाणी देणे, झाडांची स्वच्छता व देखभाल याची खबरदारी विद्यार्थी घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी आसपास राहणार्या नागरिकांमध्ये वृक्षारोपण आणि संगोपनाबद्दल जागृती केली. लागवड करण्यात आलेली झाडे शाळेतील प्रत्येक वर्गाला दत्तक देऊन, त्यांच्या संगोपनाची जबाबदारी देण्यात आली.





