सातारा | बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात बस थांब्याची गरज

कृष्णानगर – सातारा बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी एकेरी वाहतूक करून सोडवली. या एकेरी वाहतुकीच्या अंतर्गत पुणे, मुंबईला जाणार्या बसेस जिल्हा परिषद, बॉम्बे रेस्टॉरंट चौकमार्गे जाव्यात आणि या बसेस बॉम्बे रेस्टॉरंट चौकात प्रवाशांसाठी थांबवण्याचा आदेश आदेश काढण्यात आला. मात्र, या चौकात एसटीचा एकही कर्मचारी नियुक्त नसल्याने आणि बसथांबा असल्याचा फलक नसल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.
एकेरी वाहतुकीमुळे बसेस शहराबाहेर पडताना, अंतर वाढले आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात पाच रुपये वाढ करण्यात आली आहे. यास चार महिने उलटून गेले असले, तरी बहुतांशी बसेस पारंगे चौकमार्गे पुणे, मुंबईकडे जात आहेत. या मार्गावर पोलीस कवायत मैदान असून, अनेक वेळा हा मार्ग बंद असतो, तेव्हा बाहेरील आगारांच्या चालकांची तारांबळ उडते. त्याचबरोबर पोवई नाक्यावर या बसेस धोकादायक वळण घेत असताना, मागे वाहनांच्या रांगा लागतात. या रस्त्यावर खालून वर येणारी वाहने वेगात असल्याने, बसचालकांची तारांबळ उडते. या ठिकाणी खाजगी प्रवासी वाहतूक थांबा असल्याने अडचणीत आणखी वाढ होत आहे.
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात एसटीचा कर्मचारी नियुक्त नसल्याने, तसेच एसटी थांब्याचा फलक नसल्याने, या परिसरातील महिलांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सातारा बसस्थानकात यावे लागते. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. या संदर्भात विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याशी गेल्या महिन्यात दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, काही तांत्रिक अडचणी असून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते; परंतु हे आश्वासन हवेत विरल्याने प्रवाशांची निराशा झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाकडे जावे लागत असल्याने, प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुणे, मुंबईकडे जाणार्या सर्व बसेस या मार्गे वळवण्यात याव्यात आणि वाहतूक नियंत्रण कक्षाची चौकी उभारण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. याबाबत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवेदन देण्यात येणार आहे.





