Satara Municipal Council: सातारकरांवर कराचा बोजा वाढणार? नगरपालिकेकडून चतुर्थ वार्षिक पाहणीला सुरुवात
Satara Municipal Council: नगरपालिकेच्या उत्पन्नात १५ टक्के वाढ करण्याचे लक्ष्य; शहरात १७ हजारांहून अधिक घरगुती व व्यावसायिक मालमत्तांचे स्वतंत्र एजन्सीमार्फत होणार नवीन वर्गीकरण.

Satara Municipal Council – सातारा नगरपालिकेच्या उत्पन्नाचा कणा असलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीच्या महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने 2026 ते 2031 या कालावधीसाठी चतुर्थ वार्षिक पाहणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रक्रियेला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाली असून, स्वतंत्र एजन्सीमार्फत शहरातील सर्व मालमत्तांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, वर्गीकरण व करमूल्य निर्धारण केले जाणार आहे.
सातारा शहराच्या हद्दवाढीनंतर मालमत्तांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. हद्दवाढीपूर्वी शहरात सुमारे 8,700 मालमत्तांची नोंद होती. आता हा आकडा साडे सतरा हजारांहून अधिक झाला आहे. त्यामुळे वाढलेल्या शहराच्या स्वरूपानुसार करआकारणीची नव्याने मांडणी करणे नगरपालिकेसाठी आवश्यक बनले आहे. सध्या शहरात घरगुती मालमत्तांवर 5 टक्के, तर व्यावसायिक मालमत्तांवर 10 टक्के दराने मालमत्ता कर आकारला जातो.
करमूल्य निर्धारण समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समिती सुनावणी घेऊन अंतिम करदर निश्चित करणार आहे. विशेष म्हणजे, मागील चतुर्थ वार्षिक पाहणीच्या अंमलबजावणीत विविध तांत्रिक अडचणी आल्याने ती प्रत्यक्षात लागू होण्यासाठी 2022 साल उजाडले होते. त्या अनुभवातून धडा घेत यंदा प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यावर नगरपालिकेचा भर असून,
सर्वेक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तयारी सुरू झाली आहे. नगरपालिकेकडून सर्व घरकुले, व्यावसायिक आस्थापने, वापरातील बदल, बांधकामातील वाढ तसेच नव्या मालमत्तांची अचूक नोंद घेण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर निश्चित कालावधीत समितीच्या मंजुरीनंतर माहिती प्रमाणित करून अंतिम कररचना निश्चित केली जाणार आहे.
याबाबत मुख्याधिकारी विनोद जळक यांनी सांगितले की, चतुर्थ वार्षिक पाहणीसाठी स्वतंत्र एजन्सी नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रत्येक मालमत्तेची अचूक माहिती संकलित करून नियमानुसार वर्गीकरण केले जाईल. पारदर्शक आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे.
महसूलवाढीचे मोठे लक्ष्य
घरपट्टी आणि पाणीपट्टी हे सातारा नगरपालिकेच्या महसुलाचे दोन प्रमुख आधार आहेत. नियमानुसार प्रत्येक पंचवार्षिक पाहणीनंतर महसुलात सुमारे 15 टक्के वाढ अपेक्षित मानली जाते. विशेषतः व्यावसायिक मालमत्तांकडून 100 टक्के कर वसुली आणि सर्व नोंदी अद्ययावत ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहणार आहे. नगरपालिकेच्या माहितीनुसार अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये रचनेत झालेले बदल, वापरातील परिवर्तन, तसेच घरगुती मालमत्तांमधील भाडेकरू किंवा व्यावसायिक वापराच्या नोंदी न होणे, हे महसूलवाढीतील प्रमुख अडथळे ठरत आहेत.
डिजीटल सर्वेक्षणाचा विचार
यंदाची चतुर्थ वार्षिक पाहणी अधिक आधुनिक करण्यासाठी मोबाइल अॅप, जीआयएस आधारित नकाशे, ऑनलाइन पोर्टल आणि डिजीटल मोजणी प्रणालीचा वापर करण्याबाबत प्रशासन स्तरावर विचार सुरू आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान माहिती थेट डिजीटल स्वरूपात नोंदविण्याची व्यवस्था केल्यास भविष्यात करप्रणाली अधिक पारदर्शक आणि अचूक होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






