Satara Municipal Council: पक्ष एक, गट दोन! पालिकेत खासदार गटाच्या ‘वॉक आऊट’ने खळबळ, नक्की काय घडलं?
Satara Municipal Council: खासदार उदयनराजे विरुद्ध आमदार शिवेंद्रसिंहराजे गटातील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर; सातारकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण.

Satara Municipal Council – सातारा नगरपालिकेतील भाजपची अवस्था सध्या पाहिली तर पक्ष एकच आणि राजकारण दोन असे चित्र दिसते. एका बाजूला सातारा विकास आघाडी, दुसर्या बाजूला नगर विकास आघाडी. नावे वेगळी असली तरी झेंडा एकच आहे. पण वागणूक अशी की जणू दोन परस्परविरोधी पक्षच आमनेसामने उभे आहेत. मग प्रश्न असा पडतो की, ही आघाडी विकासासाठी आहे की अहंकाराच्या स्पर्धेसाठी?
भारतीय जनता पक्षाची ओळख देशभर पक्षशिस्त, संघटन आणि निर्णय प्रक्रियेतील एकसंधतेसाठी आहे मात्र, सातारा नगरपालिकेत या शिस्तीचा अक्षरशः पंचनामा होताना दिसत आहे. वरिष्ठ नेते एकजुटीचे धडे देत आहेत आणि स्थानिक पदाधिकारी त्याच धड्याला सभागृहात ठेंगा दाखवत आहेत. पहिल्याच सर्वसाधारण सभेत वैयक्तिक आरोप, शिवराळ भाषा आणि राजकीय चिखलफेक झाली.
तेव्हाच सभागृहाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एकत्र येऊन नगरसेवकांना एकीचा आणि पक्षशिस्तीचा संदेश दिला. परंतु तो संदेश नगरसेवकांच्या कानापर्यंत पोहोचला की नाही, हा संशोधनाचा विषय ठरावा. स्थायी समितीच्या बैठकीत घडलेला प्रकार तर अधिकच बोलका आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाच्या खर्चाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी आक्रमक भाषा वापरण्याची निवड करण्यात आली. प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा भाग असतो, पण येथे प्रश्न विचारणार्यालाच विरोधक समजण्याची नवी राजकीय पद्धत सुरू झाली आहे. परिणामी शब्दाला शब्द वाढला, वातावरण तापले आणि खासदार गटाने वॉकआऊट केला. म्हणजे विकासाच्या चर्चेपेक्षा अहंकाराच्या स्पर्धेलाच अधिक महत्त्व मिळाले.
नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सभा चालते म्हणजे केवळ सभेत उपस्थिती ही जबाबदारी नसते; सभागृहाचा तोल सांभाळण्याचीही असते. संयम सुटत असेल, भाषा बिघडत असेल आणि पदाधिकारी मर्यादा ओलांडत असतील तर त्यांना आवरण्याची जबाबदारी कोणाची? नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तो तोल सांभाळण्याचा प्रयत्न सुद्धा केला मात्र त्याला दाद दिली गेली नाही.
विसंगती अशी की दोन्ही गट भाजपचेच आहेत. दोघांचेही राजकीय नेतृत्व एकाच पक्षाकडे आहे. तरीही प्रत्येक मुद्द्यावर खासदार गट आणि आमदार गट अशी विभागणी होते. मग भाजपची अधिकृत भूमिका कोणती आणि गटांची भूमिका कोणती? पक्ष मोठा की गटबाजी मोठी? या प्रश्नांची उत्तरे आता सातारकर मागू लागले आहेत.
खासदार उदयनराजे भोसले हे 17 स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करतात. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे राज्याच्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी आहे. अशा दोन प्रभावी नेत्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे सभागृह आदर्श ठरायला हवे होते. पण प्रत्यक्षात आदर्शाऐवजी आरोप, विकासाऐवजी वाद आणि शिस्तीऐवजी शक्तिप्रदर्शन सुरू आहे.






