सातारा – माण-खटावला मिळणार दुष्काळी योजनांचा लाभ

सातारा – अवर्षणप्रवण क्षेत्रातील माण आणि खटाव या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दोन्ही तालुक्यांमधील सध्याची टंचाई परिस्थिती पाहता दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात येणार आहे. दोन्ही तालुक्यांतील शेतकरी आणि जनतेला दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळणार असल्याची माहिती आ. जयकुमार गोरे यांनी दिली.
आ. जयकुमार गोरे यांनी 21 ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन माण आणि खटाव तालुक्यातील अत्यल्प पर्जन्यमानाची आणि टंचाईसदृश्य परिस्थितीची माहिती दिली होती. दोन्ही तालुक्यांतील कमी पाऊस, पावसाचा खूप दिवसांचा खंड, पाणी पातळीतील घट, पीक पेरा आणि उत्पादनातील घट, पिके वाया जाणे, जनावरांच्या चाऱ्याची गंभीर स्थिती, पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांची सध्याची स्थिती याविषयी सर्व माहिती आ. गोरे यांनी दिली होती.
महा मदत प्रणालीद्वारे केलेल्या सर्वेक्षणात त्रुटी राहिल्याने दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळी यादीत झाला नाही. त्यामुळे आ. गोरे यांनी काल पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन खटाव आणि माण तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याची तसेच दुष्काळी मदत देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी माण तालुक्यातील 110 गावांची तसेच खटाव तालुक्यातील 136 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आणून दिले. एकाही तलाव, मध्यम तसेच लघु प्रकल्पात पावसाच्या पाण्याची आवक झाली नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.





